४ लाख २४ हजार रुपयांचा साठा जप्त : दोघांविरोधात गुन्हा दाखल
वेंगुर्ले : दाजी नाईक
काही दिवसांपूर्वी बोगस खत विक्री करणारा टेम्पो उभादांडा येथे कृषी विभागाने पकडला. हे प्रकरण ताजे असतानाच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कृषी विभागाच्या पथकाने वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथे सायंकाळी कृष्णप्रभा ॲग्रोटेक विक्री केंद्रात धाड टाकली. यावेळी तेथे विनापरवाना कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके साठवून विक्री केल्याचे निर्देशनास आल्याने तेथील सुमारे ४ लाख २४ हजार ४४ रुपयांचा सर्व साठा जप्त करून या विक्री केंद्राला सील करण्यात आले. तसेच वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची खते कीटकनाशके उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभाग सध्या सर्वत्र तपासणी करत आहे. आडेली येथे बोगस खत विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यामुळे तत्काळ रविवारी सायंकाळी वेंगुर्ले चे कृषी अधिकारी प्रकाश मोहिते हे श्री. सुशांत भोसले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा सिंधुदुर्ग, यांचे सोबत आडेली येथे कृष्णप्रभा ॲग्रोटेक या नावाने चालु असलेल्या विक्री केंद्रात धडक दिली. सदर विक्री केंद्रात उपस्थित कर्मचारी यांना विक्री केंद्र परवान्या बाबत विचारणा केली असता सदर विक्री केंद्र संजय कृष्णा मडव वय ४६ रा. कुडाळ व सौ समिक्षा धुरी वय ३५ (पत्ता माहीत नाही ) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. पण त्यांच्या कडे कृष्णप्रभा ॲग्रोटेक या फर्मच्या खते, बियाणे व किटक नाशके या निविष्ठा विक्रीचा अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वेंगुर्ले पोलिस गवस यांना बोलावुन घेवुन सदरबाबत माहिती दिली. सदरील विक्री केंद्राच्या तपासणी मध्ये विविध कंपन्यांची खते, बियाणे व किटक नाशके विनापरवाना साठवणुक व विक्री होत असल्याचे आढळले ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वेंगुर्ले चे कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडेली येथील या विक्री केंद्रात विनापरवाना मिळालेल्या मालामध्ये कीटक नाशके – एकूण साठा 317.46 किलोग्रॅम / लिटर एकूण रक्कम -235639, खते एकूण साठा 233.60 किलोग्रॅम / लिटर एकूण रक्कम 176640 आणि बियाणे एकूण साठा 74.10 किलोग्रॅम,एकूण रक्कम 11765 असा एकूण ४ लाख २४ हजार ४४ रुपयांचा साठा आढळला. या गुन्ह्यांबाबत दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३(२)(डी), ७(१)(ए)(ii)
खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ४(ए), ४(बी), ५,८,३५(१)(ए), ३५(१) (बी), बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे खंड ३(१),८(ए), ८(बी), ९,१८(१),१८(२), कीटकनाशके अधिनियम १९६८ चे कलम १३ (१),१८(२),२९(१)(सी), कीटकनाशके नियम १९७१ मधील नियम १०(१),१०(४),(१०)(डी)(ए), १०(डी)(बी) नुसार त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार योगेश सराफदार अधिक तपास करीत आहेत.













