मुंबई:
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या द्विवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी ‘एकता पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीची मतमोजणी १५ जून रोजी चेंबरच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपन्न झाली. संपूर्ण महाराष्ट्रात पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत केवळ नाशिक आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत प्रत्यक्ष मतदान झाले होते, त्यामुळे संपूर्ण राज्यासह विशेषतः सिंधुदुर्गातील उद्योग व व्यापारी जगताचे या निकालाकडे लक्ष लागले होते.
चेंबरचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष रवींद्र माणगावे तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष व कोकणचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकता पॅनेलने एकूण नऊ जागांसाठी ही निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या एकता पॅनेलला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रिज असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याच्या बळावर आणि मतदारांच्या विश्वासामुळे एकता पॅनेलच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधी ‘प्रगती पॅनेल’चा पराभव केला.
निवडणूक निकालात कोकण विभागीय अध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले एकता पॅनेलचे संतोष राणे यांना १८६ मते मिळाली. तर मुंबई व कोकण विभागातून वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले सुधाकर शेट्टी यांनी ८५४ मते मिळवून आपला विजय अधोरेखित केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिलच्या ७ जागांवर एकता पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये राजन नाईक यांना १७३, ॲड. नकुल पार्सेकर यांना १६४, मनोज वालावलकर यांना १५८, विजय केनवडेकर यांना १४६, मिलिंद प्रभू यांना १४२, विशाल कामत यांना १४१ तर कुणाल वरसकर यांना १३९ मते मिळाली.
दुसऱ्या बाजूला विरोधी प्रगती पॅनेलच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले. प्रगती पॅनेलचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार भालचंद्र राऊत यांना ६६ मते मिळाली. तर गव्हर्निंग कौन्सिलसाठी सौ. अन्वेषा आचरेकर यांना ७७, गंगाराम पै यांना ८४, अशोक सारंग यांना ८४, भालचंद्र सामंत यांना ८१, राजेंद्र गावकर यांना ६०, रामचंद्र घोगळे यांना ५० आणि उत्तम सराफदार यांना ३७ मतांवर समाधान मानावे लावले.
एकता पॅनेलच्या या यशानंतर सर्व विजयी उमेदवारांचे चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब, कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, सचिव राजू जठार, सामाजिक कार्यकर्ते रणजित देसाई तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व सुज्ञ मतदारांनी बहुमताने विजयी केले, त्याबद्दल एकता पॅनेलच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.











