मसुरे | झुंजार पेडणेकर
अल निनोच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकनी टंचाई जाणवू नये आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत . पळसंब झरिचा वहाळ येथील श्री. नितीन सावंत आणि सौ. रंजना सावंत या पती-पत्नीने स्वप्रयत्नातून आणि सहभागातून बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे. या सावंत दांपत्याच्या या प्रेरणदायी कामगिरीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
कौटुंबिक एकजूट अन् समाजासाठी आदर्श!
आजच्या काळात सामूहिक श्रमदानाचा आणि पर्यावरण रक्षणाचा वारसा जपणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सावंत पती-पत्नीने एकत्र येत हाती घेतलेले हे कार्य केवळ कौटुंबिक स्तरावरच नव्हे, तर संपूर्ण समाजमन ढवळून काढणारे ठरले आहे. एखादा ध्येयनिष्ठा मनाशी बाळगून कुटुंबाने एकत्र काम केले, तर समाजापुढे कसा एक नवा वस्तुपाठ निर्माण होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या दांपत्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्याकडून कौतुक
सावंत दांपत्याच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल पळसंब गावचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी घेतली आहे. त्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन आणि सावंत दांपत्याचे अभिनंदन करताना सांगितले की नितीन सावंत आणि सौ. रंजना सावंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन बांधलेला हा बंधारा गावातील जलसंधारणाच्या कामाला मोठी दिशा देणारा आहे. अशा प्रकारच्या सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामांमुळेच गाव समृद्ध आणि सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होते. या दांपत्याचा हा आदर्श इतर ग्रामस्थांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
पाण्याचे महत्त्व आणि संदेश
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. झरिचा वहाळ परिसरात बांधण्यात आलेल्या या बंधार्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाच्या या चळवळीत सावंत दांपत्याने दिलेले हे लक्षवेधी योगदान इतरांसाठी मार्गदर्शक ठरणारे असून, ‘आपले गाव, आपला विकास’ या भावनेला बळ देणारे ठरले आहे.












