मुरुड येथे भारतरत्न महर्षी कर्वे स्मारकासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देणार : आ. प्रमोद जठार

पर्यटन व्यवसायिकांच्या मागणीला यश; मुरुडमध्ये साकार होणार महर्षी कर्वे स्मारक

दापोली(प्रतिनिधी) – मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या कार्यपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत दापोली दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यावसायिक, वकील, डॉक्टर आणि समाजसेवक यांची भेट घेतली. तसेच मुरुड येथे दापोली तालुक्यातील हॉटेल व पर्यटन व्यवसायिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.

दापोली तालुक्यातील पर्यटन व हॉटेल व्यवसायिकांच्या झालेल्या बैठकीत मुरुड गावामध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी स्मारकाच्या उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
मुरुड हे भारतरत्न महर्षी कर्वे यांचे जन्मस्थान असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती मिळावी यासाठी स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. पर्यटन व्यवसायिक महासंघ, दापोली पर्यटन मंच, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन तसेच तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांच्या वतीने श्री. विराज खोत, श्री. दीपक विचारे, श्री. बाळासाहेब नकाते, श्री. विवेक भावे आणि श्री. देवेंद्र जाधव, श्री विद्यमान गुरव,श्री बांदल,श्री विकास जैन तसेच उपस्थित सर्व पर्यटन व्यवसायिकांनी ही मागणी हॉटेल अमरनाथ या ठिकाणी आमदार जठार यांच्यासमोर hi मागणी मांडली होती.

या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत आमदार प्रमोद जठार यांनी स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच स्मारक उभारणीसाठी आवश्यक जमीन व जागा निश्चित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

स्मारक उभारल्यानंतर महर्षी कर्वे यांचा जीवनप्रवास, सामाजिक कार्य आणि इतिहास पर्यटकांना पाहता येणार असून मुरुडच्या पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे हा परिसर दापोली तालुक्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाचे सर्व हॉटेल व्यवसायिक, पर्यटन व्यावसायिक तसेच मुरुड ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस श्री. अक्षय फाटक, जिल्हा उपाध्यक्ष श्री. मकरंद म्हादळेकर, जिल्हा सरचिटणीस श्री. वसंत ताम्हणकर, दापोली ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री. सचिन होडबे, दापोली शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. जयाताई साळवी, तालुका सरचिटणीस श्री. विवेक भावे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. विराज खोत तसेच दापोली तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित हॉटेल व पर्यटन व्यवसायिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.