लांबलेल्या मान्सूनमुळे पेरण्या खोळंबल्या, बळीराजा धास्तावला

नरेंद्र मोहिते राजापूर:
दरवर्षी मे महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ७ जून पासून सुरू होणारा मान्सून याची कोकणातील शेतकऱ्यांना सवय झालेली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापुर्वी आपली आगोटची कामे आटोपून शेतीच्या कामासाठी बळीराजा सज्ज झालेला असातो. मात्र यावर्षी मे महिन्याच्या अखेरला अवकाळी पाऊस झाला पण अगदीच तुरळक प्रमाणात. मात्र त्यानंतर आता मान्सून सुरू होणार आणि पेरणीसह शेतीच्या कामांना प्रारंभ करणार अशा तयारीत असलेल्या बळीराजाची पुरती निराशा झाली आहे. अल निनो वादळामुळे मान्सुन पुर्णपणे लांबला असून मृग नक्षत्र (मिरग) संपत आले तरी मान्सून सुरू न झाल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे.
पाऊस कधी पडणार आणि पेरणी कधी करणार असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असून मधल्या काळात पडलेल्या मान्सुनपुर्व पावसा नंतर आता मान्सून सुरू होईल या आशेवर पेरणी केलेले शेतकरी पाऊस गायब झाल्याने हवालदिल झाले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसात एक थेंबही पाऊस न झाल्याने ही रोपे करपली असून काही शेतकरी विहिरीचे पाणी पंपाने खेचून ते या पेरलेल्या रोपांना जगवण्यासाठी लावत आहेत, तर काही शेतकरी डोक्यावरून पाणी आणून ही रोपे जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच लांबलेला मान्सून पहाता आता पेरणी कधी करायची आणि पुढे शेती कशी करायची असा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे.
कोकणातील आंबा व काजू पिकही निसर्गाच्या बदलत्या समतोलामुळे यापुर्वीच धोक्यात आलेले आहे. त्यामुळे दरवर्षी आंबा काजू बागायतदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. सुपारी पिकालाही बुरशी जन्य रोगाने ग्रासले आहे. तर अन्य किरकोळ पिकेही बेभरवशाची झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचा शेतीकडील कल कमी झाला आहे.
कोकणात आणि खास करून राजापूर तालुक्यात खरिप हंगामात मोठया प्रमाणावर भातशेती केली जाते. त्याच बरोबर या काळात नाचणी, वरी, उडीद पिकही घेतले जाते. भाताच्या नवनवीन बियाण्यांचा वापर करून आता या खरिप हंगामात कोकणात चांगल्या प्रकारे भातशेती केली जाते. गेल्या काही वर्षात भात पिकाला चांगला दरही मिळू लागला आहे. त्यामुळे मग शेतकरी या हंगामात आपला सगळा वेळ हा या पिकासाठी देत असतो.
मात्र यावर्षी मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. अल निनो वादळाच्या प्रभावामुळे मान्सुन लांबल्याचे हवामान विभागाने यापुर्वीच जाहिर केले आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. दरवर्षी कोकणात मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरडयात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालतो. यावर्षीही काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. मात्र तेवढया मोठया प्रमाणात तो नव्हता. आता दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ७ जून पासून मान्सून सक्रिय होईल अशी आशा होती. प्रारंभी तसे वातावरणही होते, मात्र गेल्या काही दिवसात अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून पुढे सकरतच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण म्हटलं की जून मध्ये पावसाचा धुमाकूळ अशीच परिस्थिती असते,.
महाराष्ट्रात शेती आणि मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे मृग नक्षत्र (मृगशिरा) यावर्षी ८ जून २०२६ (सोमवार) रोजी सुरू झाले. ८ ते २२ जून असा हा मृग नक्षत्राचा कालावधी आहे. या काळात पडणाऱ्या पावसावर खरीप हंगामातील पेरणीची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. मात्र आता मृग नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचा पत्ता नाही अशी परिस्थित आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत असून, पेरणीची कामे खोळंबल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाअभावी भात रोपे तयार करण्याचे कामही मंदावले असून, शेतीशी संबंधित सर्व कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. मान्सून आणखी लांबल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मृग नक्षत्र संपत आले तरी मान्सूनने अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने राजापूर तालुक्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. दरवर्षी याच काळात भात पेरणीला वेग येत असतो. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने शेतात मशागत करून तयार ठेवलेली जमीन पडीक पडली असून, शेतकऱ्यांचे सर्व नियोजन कोलमडले आहे.
राजापूर तालुक्यात दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार शेतकरी खरीप हंगामात भात शेती करतात. तालुक्यात सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. कोकणातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने मान्सूनचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरतो.
वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे. आधीच वाढलेले बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचे खर्च यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट उभे राहिले आहे. पाऊस आणखी लांबल्यास खरीप हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.