जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचा सेवागौरव सोहळाही होणार संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी :शासनाने सहकारी पतसंस्था चळवळ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्था पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे योजिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (पुणे) व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व नागरी, ग्रामीण बिगरशेती आणि पगारदार पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, दिनांक २४ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालयाशेजारी), ता. कुडाळ येथे होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी दिली आहे.
या एक दिवसीय प्रशिक्षणात ‘इनकम टॅक्स प्रणाली’, ‘प्रभावी कर्ज वसुली’ तसेच ‘कर्ज वितरण धोरण’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. हे प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अशी करा नोंदणी:
या प्रशिक्षणासाठी प्रति प्रतिनिधी ₹१५००/- (अक्षरी पंधराशे रुपये मात्र) प्रशिक्षण शुल्क आकारण्यात आले आहे. सर्व पतसंस्थांनी सदर शुल्क ‘MAHARASHTRA CO-OP DEVELOPMENT CORPORATION’ यांच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खाते क्र. ०३४००१६०००६००२३ (IFSC CODE- HDFC0CPDCCB, शाखा- Agri.College, Pune) या खात्यावर भरून आपली नोंदणी निश्चित करावी. तसेच नोंदणी केल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी यांच्या ९१३०३४३७६७ या मोबाईल क्रमांकावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रतिनिधींची नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी केले आहे.
जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा:
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. श्री. सोपान शिंदे साहेब हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने, प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच २४ जून २०२६ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.












