विलवडेत गोवा बनावटीच्या दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

​बांदा : प्रतिनिधी
बांदा-दाणोली रस्त्यावरील विलवडे गावच्या चर्चसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने गुरुवारी बेकायदा दारू वाहतूक विरोधात कारवाई केली. स्विफ्ट डिझायर कारसह एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

​राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुरुवारी विलवडे येथील चर्चसमोर संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी तेथून जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची (एमएच ०२ सीपी २९०९) तपासणी केली असता, कारच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँड असलेले एकूण ३५ बॉक्स आढळून आले.

​या अवैध दारू वाहतूक प्रकरणी पथकाने संतोष मुरलीधर नागरे (वय ३७, रा. पिंपळगाव, जि. नाशिक) आणि रविंद्र भाऊसाहेब शिंदे (वय ३३, रा. रेडगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. ​या कारवाईत ४ लाख ५५ हजार ४० रुपये किमतीची दारू आणि ३ लाख ५० हजार रुपयांची कार असा एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. पी. सुर्वे, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, आणि सिंधुदुर्ग अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर ​कारवाई दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतिश चौगुले, सागर सूर्यवंशी आणि अभिषेक खत्री यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करत आहेत.