गणपतीपुळे UPDATE : संभाजीनगरच्या समुद्रात बुडालेल्या ५ पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्रात होते. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या पाच दुर्दैवी पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली. दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, श्री. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईकणकर हेही स्वतः घटनास्थळी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्व पर्यटक बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील होते. त्यांच्यामध्ये आदित्य संतोष राऊत – २२,अनिकेत बंडू हिवराळे – २०, आनंद राजू नरवाडे – २०, प्रेम दीपक आदमाने – १९, यश रामेश्वर कांबळे – १९,यांचासह  आशिष प्रकाश वाघमारे – वय २०, अक्षय जगदीश आव्हाड – वय १८, सुजल विष्णू वाघमारे – वय १८, ऋषी कल्याण हिवराळे – वय १८, प्रणव संतोष चाबुकस्वार – वय २१, अजय कौतिक मुळगडे – वय २१ , आलोक प्रकाश कुडुक – वय १९, रोहित अंबादास जावळे – वय २३, सचिन राधाकिसन टेके – वय २३, मयुर विष्णू बोडखे – वय १८, कार्तिक दत्तात्रय बोडखे – वय १७, राहुल भारत गव्हाणे – वय २१, विशाल दत्तू रायमले – वय २१,  योगेश्वर बद्रीनाथ गरड आणि चालक गणेश पंढरीनाथ दिवटे – वय ५३, यांचा समावेश होता. ते गाडी क्रमांक: MH 20 DL 9283 मधून गणपतीपुळे येथे आले होते.

शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास या गटातील काही सदस्य समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाच जण खोल पाण्यात ओढले गेले. घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी तसेच तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. अखेरीस संध्याकाळी एकाचा मृतदेह हाती लागला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली आहे.

समुद्रात सध्या पाण्याला करंट असल्याने शोधमोहिमेत अडचणी येत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.