आंबोली फॉरेस्ट नाका येथे गोवा बनावटीच्या दारूसह ३ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात

सावंतवाडी : बांदा ते संकेश्वर महामार्गावरील आंबोली फॉरेस्ट नाका येथे सावंतवाडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी टाटा सुमो गाडी पकडण्यात आली असून, वाहनासह एकूण ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४० वर्षे, रा. वरवंड गणेश वाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २१ जून रोजी पहाटे ०१:१० वाजताच्या सुमारास बांदा-संकेश्वर महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आंबोली फॉरेस्ट नाका येथे सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, संशयास्पद वाटलेली पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड (रजिस्टर नंबर MH-42-K-0269) थांबवून तिची झडती घेतली असता, त्यात बेकायदेशीर व बिगरपरवाना गोवा बनावटीच्या ‘इम्पेरियल ब्लू’ (IMPERIAL BLUE HAND PICKED GRAIN WHISKY) कंपनीचा दारूसाठा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी आणि १८० मिली मापाच्या एकूण ५७६ काचेच्या बाटल्या (१२ पुठ्ठ्याचे बॉक्स, प्रत्येक बाटलीची किंमत ९५ रुपये) असा एकूण ४८,९६० रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. गाडी आणि दारू मिळून एकूण ३,४८,९६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सदरची यशस्वी कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार रामदास जाधव, मनिष शिंदे, गौरव परब आणि होमगार्ड आनंद बरागडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक श्री. गौरव गोविंद परब (वय ३६ वर्षे) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(इ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दूरक्षेत्र आंबोलीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल/११५३ शिंदे करीत आहेत.