हिंदुत्व भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या परंपरेतून घडलेला जीवन दृष्टिकोन- डॉ. उदय निरगुडकर

हिंदुत्व भारतीयत्वाची व्यापक संकल्पना या विषयावर व्याख्यान
रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचा पुढाकार

चिपळूण (प्रतिनिधी):- हिंदुत्व हा केवळ एखाद्या धर्माचा किंवा पंथाचा विषय नाही, तर तो भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या परंपरेतून घडलेला जीवनदृष्टिकोन आहे. “वसुधैव कुटुंबकम्” आणि “सर्वे भवन्तु सुखिनः” यांसारख्या उदात्त विचारांनी जगाला मानवतेचा संदेश देणारी ही जीवनपद्धती आहे. हिंदुत्व म्हणजे सर्वांना सामावून घेणारी, विविधतेचा आदर करणारी आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व पाहणारी व्यापक विचारधारा होय. त्यामुळे हिंदुत्वाचा पाया प्रेम, सहिष्णुता, करुणा आणि कर्तव्यभावनेवर उभा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तथा अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.

रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या पुढाकाराने चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत माननीय डॉ.उदय निरगुडकर यांचे ‘हिंदुत्व : भारतीयत्वाची व्यापक संकल्पना’ या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी भारत मातेला वंदन करून आणि दीपप्रज्वलन करून व्याख्यान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते डॉ. उदय निरगुडकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मंदार लेले, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री उदय चितळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह राजेश सोहनी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, कार्यवाह डॉ. सौ. मीनल ओक, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, भाजपचे नेते सहदेव बेटकर, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रशांत यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अत्यंत सरळ,सहज आणि सोप्या शब्दात हिंदुत्वाची व्याख्या विशद केली. त्यांनी मांडलेले विचार व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांसह सभागृहातील लोकांनाही प्रचंड भावले. स्वतः व्याख्याते डॉ. उदय निरगुडकर यांनी प्रशांत यादव यांच्या प्रस्तावनापर भाषणाचे तोंडभरून कौतुक केले. प्रशांत यादव यांनी अत्यंत कमी शब्दात मांडलेली हिंदुत्वाची संकल्पना अतिशय सुंदर होती, असेही डॉ. निरगुडकर म्हणाले.

यावेळी डॉ. उदय निरगुडकर आणखी पुढे म्हणाले की, हिंदुत्व हे किती व्यापक आणि राष्ट्राचा गाभा आहे,याचे अनेक दाखले देताना त्यांनी भगवा झेंडा या विषयावर विस्तृत विवेचन केले. भगवा झेंडा गाडीवर लावून घोषणा देत फिरणे हे ही हिंदुत्व नव्हे. थोरल्या महाराजांचे निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांनी भगवा हाती घेतला आणि बलाढ्य अशा क्रूरकर्मा औरंगजेबला कित्येक वर्षे येथे झुंजवत ठेवले,अखेर त्याला या महाराष्ट्रात मूठमाती देण्यात आली ही भगव्याची ताकद आहे. नुकतेच बंगाल मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी एका ९२ वर्षीय व्यक्तीचा सत्कार केला, तो सर्वप्रथम भगवा घेऊन बंगालमध्ये गेलेला नागरिक होता. त्याचे नाव होते, ‘माखनलाल सरकार,’ प्रधानमंत्र्यांनी त्या व्यक्तीचा नव्हे तर त्या भगव्याचा तो केलेला सन्मान होता, हे आहे हिंदुत्व, असा वेगळा दाखला देखील त्यांनी दिला. अफगाणिस्तान, बांगलादेश,थायलंड ही सर्व आपली राज्य होती, इंडोनेशियामध्ये आज ही हिंदूचे एक स्वतंत्र बेट आहे. आपण हे सर्व विसरलो आणि मोबाईलमध्ये गुंतून बसलो. हा मोबाईल एकदा घात करणार आहे. हमास व इजराईल युद्धात हजारो महिला,आणि लहान मुले का मारले गेले .? त्यांचा घात या मोबाईलने केला, असे सविस्तरपणे नमूद करत डॉ. निगुडकर म्हणाले, मोबाईल किती आणि कधी वापरायचा याचा विचार करावा,असे उत्तम मार्गदर्शन देखील त्यांनी केले.

शेवटी ते म्हणाले हिंदुत्वाला चार भिंतीत अडकवून ठेवू नका.काय होतो आपण आणि काय झालो आपण,याचा सखोल अभ्यास करा,जगातील श्रीमंत देश हिंदुत्वाची व्याख्या समजू शकले नाहीत,पण भारत देशाने, तुम्ही-आम्ही ते विचार ती संकल्पना आणि ती व्यख्या घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून या देशात हिंदुत्व संस्कृती व संकल्पना दृढ होत असून आगामी काळात आपण ताकदीने त्याला पुढे नेण्याची गरज असल्याचे डॉ. उदय निरगुडकर म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर हिंदुत्वाने या राष्ट्राला अनेक संकटांमधून उभारी दिली आहे. परकीय आक्रमणे, सामाजिक आव्हाने आणि सांस्कृतिक संघर्षांच्या काळातही भारतीय समाजाने आपल्या संस्कृतीचे अस्तित्व टिकवून ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना केवळ राजकीय सत्ता नव्हे, तर स्वाभिमान, संस्कृती आणि धर्मरक्षणाचा आदर्श उभा केला. अनेक संत, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांनी हिंदुत्वाच्या मूल्यांमधून समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यामुळे हिंदुत्व हा इतिहासाचा गौरवशाली वारसा आहे, असेही वक्ते डॉ.उदय निरगुडकर यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तथा चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.