खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील संभाव्य पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी जिंदल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून खेड नगरपरिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या नातूनगर व खोपी धरण व्यवस्थापनाला गरजेनुसार पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे खेड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शहर पाणीटंचाईच्या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, रत्नागिरी यांना लेखी आदेश देत खेड शहराच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन नातूनगर आणि खोपी धरणातून आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रोडगे आणि पाणीपुरवठा सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत याबाबत लेखी निवेदन सादर केले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हा आदेश जारी केला.
या निर्णयाचे खेड शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे तसेच सर्व नगरसेवकांनी गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत. या आदेशामुळे आगामी काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.













