स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
वेंगुर्ले : दाजी नाईक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गस्ती दरम्यान रविवारी रात्री उशिरा वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत रेडी हुडा येथे २४ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्याला मोटरसायकल सह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील मनोज मोहन खोबरेकर हा काल रात्री आरोंदा ते रेडी मार्गाने जात असताना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रेडी हुडा येथे खोबरेकर याला थांबविले. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ २४,२०० रुपयांचे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सापडून आले. मोटरसायकल सह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३,३(५), अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री.मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु.नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी ही कारवाई केली आहे.












