हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी दोडामार्ग येथे ‘सकल हिंदू संमेलन’ संपन्न!

दोडामार्ग:सुहास देसाई

हिंदू धर्म, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉलमध्ये ‘सकल हिंदू संमेलन २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जयघोषात संपन्न झाले. या संमेलनाला दोडामार्ग तालुक्यातील सकल हिंदू बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

​कार्यक्रमाचे अध्यक्षपद हिंदू संमेलन संयोजन समितीचे श्री. नितीन गवस यांनी भूषवले. तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक श्री. अर्जुन चांदेकर उपस्थित होते. याशिवाय कणेरी मठ (कोल्हापूर) येथील श्री सिद्धयोगी संस्थानचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांची प्रमुख अतिथी म्हणून वंदनीय उपस्थिती लाभली.

​भारत माता सर्वश्रेष्ठ आणि राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज: श्री. अर्जुन चांदेकर
​आपल्या मार्गदर्शनात प्रमुख वक्ते श्री. अर्जुन चांदेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, हिंदूंचे योगदान आणि राम मंदिर उभारणीचा गौरवशाली इतिहास यावर सविस्तर विवेचन केले. ‘हिंदू कोण?’ यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले:

​”जी व्यक्ती भारत भूमीला आपली माता मानते आणि या देशाला राष्ट्रपुरुष मानते, ती प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. आपली पूजा पद्धती कोणतीही असो, पद्धतींमध्ये थोडाफार फरक असू शकतो; परंतु आपल्या सर्वांसाठी ‘भारत माता सर्वश्रेष्ठ’ असली पाहिजे. आज हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, हिंदू एकत्र आले तर देशासमोरील सर्व समस्या सुटतील.”

​हिंदू कुटुंब व्यवस्था आणि संस्कृती हेच जगण्याचे बलस्थान
​पुढे बोलताना श्री. चांदेकर यांनी हिंदू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांवर भर दिला. ते म्हणाले की, जगात अनेक आक्रमक आले आणि गेले, पण हिंदू धर्म व संस्कृती आजही टिकून आहे, कारण हिंदूंनी आपली कुटुंब व्यवस्था आणि परंपरा घट्ट टिकवून ठेवली आहे. हिंदू समाज सर्वांना सामावून घेणारा (सर्वसमावेशक) असून, याच विचारामुळे आज देश मोठा झाला आहे.

​दोडामार्गवासीयांची अथांग उपस्थिती
​महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या या संमेलनादरम्यान संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. दोडामार्ग तालुक्यातील गावागावातून आलेल्या अबालवृद्धांनी, महिलांनी आणि तरुणांनी या प्रबोधनाचा लाभ घेतला. हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याचा आणि संघटित राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला. कार्यक्रमाचे नियोजन हिंदू संमेलन संयोजन समितीच्या वतीने चोख ठेवण्यात आले होते.