नगर परिषदेची विकास कामे घेऊन ती रखडवणाऱ्या ठेकेदारांची घेतली झाडाझडती
राजापूर | प्रतिनिधी : शासनाच्या माध्यमातून आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून लाखो रूपयांची विकासकामे मंजूर व मार्गी लागूनही ती स्वीकारून कामे सुरू करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांची सोमवारी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. घेतलेली कामे मुदतीत पुर्ण करा असा सक्त व अंतिम ईशारा यावेळी अॅड. खलिफे यांनी ठेकेदारांना दिला.
या बैठकीला उपनगराध्यक्ष विनय गुरव, सत्ताधारी गटनेते अॅड. जमीर खलिफे, विरोधी गटनेते अॅड. राहूल तांबे तसेच मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह उभय गटातील नगरसेवक उपस्थित होते. शहरातील विकास कामांचे अनेक महिने काम करण्याचे आदेश देऊनही कामे सुरू न करणाऱ्या काही ठेकेदारांमुळे न.प.तील सर्वच लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांना नागरिकांच्या असंतोषाचा नाहक सामना करावा लागत आहे. यासाठी अशा बेपर्वा ठेकेदारांची झाडाझडती घ्यावी अशी मागणी नगरसेवक महेश शिवलकर यांनी आ. सामंत, नगराध्यक्षा एड. खलिफे तसेच मुख्याधिकारी श्री. कुंभार यांना स्वतंत्र निवेदन देऊन केली होती. या पार्श्वभूमिवर एड. खलिफे यांनी सोमवारी या ठेकेदारांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत झालेल्या चर्चेत नगरसेवक अॅड. जमीर खलिफे, अॅड. राहूल तांबे, सौरभ खडपे, दीलिप अमरे, सौ. सुयोगा जठार, सुभाष उर्फ बंड्या बाकाळकर, सौरभ पेणकर, उर्मिला बाकाळकर व अन्य नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांतील रखडलेल्या कामांबाबत नगराध्यक्षांकडे दाद मागितली. त्यावर नगराध्यक्षा सौ. खलिफे यांनी कडक शब्दात समज देऊन आगामी काळात दिरंगाईत अडकलेली कामे सुरू झाली नाहीत तर थेट ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्यात येईल अशा शब्दात समज दिली. त्यावर लागलिच कामे सुरू करण्याचे आश्वासन ठेकेदारांतर्फे देण्यात आले. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या-ज्या प्रभागांत कामे सुरू आहेत त्या प्रभागांतील स्थानिक नगरसेवकांच्या संपर्कात राहून विकासकामे पूर्ण करावीत अन्यथा सभागृह यांची गंभीर दखल घेईल असेही सांगण्यात आले. बैठकीत उपनगराध्यक्ष विनय गुरव, अॅड. जमीर खलिफे, दीलिप अमरे व सौरभखडपे यांनी अतीशय कडक भूमिका घेतली.
दरम्यान ठेकेदाराच्या कामाच्या दिरंगाईबाबत लक्ष वेधणाऱ्या नगरसेवक शिवलकर यांनी या बैठकीत सांगीतले की, न.प.च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जसे आपल्या कामाचे महिना संपताच चरितार्थासाठी वेतन नियमित लागते तसेच ठेकेदारांनाही त्यांनी केलेल्या विकासकामांची बिले काम व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वेळेत मिळणे आवश्यक आहे. जर त्यासाठी महिनोंमहिने प्रशासन तिष्ठवत ठेवत असेल तर ठेकेदारांकडूनच अपेक्षा ठेवणे रास्त वाटत नाही. या बैठकीला शहर अभियंता रणवीर देसाई तसेच बांधकाम विभागातील अधिकारी स्वप्नील पड्यार उपस्थित होते.
चौकट
मंजूर विकासकामांचा ठेका घेऊन ती सुरू करण्यासाठी डोळेझाक करणाऱ्या राजापुरातील ठेकेदांरांना याच विषयावर आ. किरण सामंत यांनी चार दिवसांपूर्वी लांजा येथे चांगलाच दणका दिला. कामे घेऊन ती सुरू न करणाऱ्या ठेकेदारांची कामे काढून घ्या अशा सूचनाच त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार आणि नगराध्यक्षांच्या अशा कडक भूमिकेमुळे ठेकेदारी वर्तणूक सुधारते का? हे आता पहावे लागणार आहे.












