धुरंधर राजकारणी आणि कार्यकुशल मंत्री ना. नितेश राणे

–अनघा निकम मगदूम, रत्नागिरी

महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर नवी क्रांती उदयास आली आहे, निळी क्रांती! आणि त्याचे निर्माते आहेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे ! धुरंधर राजकारणी आणि कार्यकुशल मंत्री म्हणून आज राज्यातच नव्हे तर देशातही नावलौकिक मिळवत आहेत.

कोणत्याही देशाची किनारपट्टी भक्कम असेल तर तो देश सुरक्षित मानला जातो. किनारपट्टी सुरक्षेचे महत्त्व सर्वात आधी आपल्याला पटवून दिले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणूनच त्यांनी त्यांनी आरमार सक्षम केले होते. काळ बदलला. शतके उलटली पण किनारपट्टीचे महत्त्व आजही कायम आहे, उलट केवळ सुरक्षाच नव्हे तर अर्थ संचयाच्या दृष्टीनेही किनारपट्टीचे महत्व वाढले आहे. याच महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे वैभव वाढवण्याची, ती भक्कम करण्याची महत्त्वाची जबाबदारी कोकणचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे नव्या दमाचे नेते नितेश नारायणराव राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत विश्वासाने सोपवली आहे आणि हाच विश्वास सार्थ ठरवत ना. राणे यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या दीड वर्षात सुरक्षा, सक्षमता, आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या ही किनारपट्टी भक्कम होऊ लागली आहे.

‘समुद्राची गाज ही विकासाची हाक’ होऊ शकते याची उत्तम जाण असलेल्या ना. नितेश राणे यांनी मंत्रिपदाच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात धडाकेबाज आणि धाडसी निर्णय घेत या खात्यामध्ये नवी संजीवनी आणली आहे. नवी बंदरे, नव्या जेट्या पासून थेट ‘मत्स्य’ला कृषीचा दर्जा देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.

ना. राणे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या पहिल्या वर्षातच आपल्या खात्यांचा रोडमॅप तयार केला आहे. त्यानुसार त्यांनी केवळ घोषणा न करता कमी कालावधीत त्या प्रत्यक्षात उतरवून मच्छिमार बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे आणि म्हणूनच या मच्छीमार बांधवांना ना. नितेश राणे आपला माणूस वाटत आहेत.

या विकास प्रवासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा म्हणजे मत्स्य व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा देण्याचा निर्णय होय. या निर्णयामुळे आता मच्छिमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणेच ०% व्याजदराने २ लाखांपर्यंतचे कर्ज, वीज दरात भरघोस सवलत आणि किसान क्रेडिट कार्डसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. इतकेच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही आता सरकारी ‘रिलीफ पॅकेज’चा आधार मिळणार आहे, ज्यामुळे या व्यवसायाला एक सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्राप्त झाली आहे.

मासेमारी हा व्यवसाय पारंपरिक असला तरी यात ना. नितेश राणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सागरी सुरक्षा आणि मासेमारी अधिक सुलभ केली आहे. देशातील पहिले इलेक्ट्रिक मासेमारी जहाज ‘विकल्पिका’ यशस्वीरीत्या लाँच करून महाराष्ट्राने पर्यावरणपूरक मासेमारीचा नवा आदर्श देशासमोर ठेवला आहे. त्याचबरोबर, सागरी सीमेवरील अनधिकृत हालचालींना लगाम घालण्यासाठी आणि अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी किनारपट्टीवर ९ जानेवारी २०२५ पासून ड्रोन आधारित कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी ‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजने’ अंतर्गत राज्यातील १२,१६० नौकांवर आधुनिक ‘ट्रान्सपाँडर’ यंत्रणा बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून ज्यापैकी ८,८२१ पेक्षा जास्त नौकांवर हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बांधवांचे लोकेशन ट्रॅक करणे आणि संकटकाळी त्यांना तातडीने मदत पोहोचवणे शक्य झाले आहे. तसेच, खलाशांची ओळख पटवण्यासाठी ‘क्यूआर कोडयुक्त आधार कार्ड’ अनिवार्य केल्यामुळे सागरी सुरक्षेसोबतच प्रशासकीय पारदर्शकताही वाढली आहे.
राज्यातील बंदरांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक खेचून आणण्यात ना. नितेश राणे यांना मोठे यश मिळाले आहे. ‘इंडिया मेरिटाइम वीक २०२५’ दरम्यान त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या वतीने तब्बल ७२,७०० कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये दिघी, जयगड आणि वाढवण यांसारख्या बंदरांच्या विकासासह, बेलापूर येथे नवीन शिपयार्ड क्लस्टर उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकच्या नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून तिथे मासे लिलावासाठी जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

जलवाहतूक आणि पर्यटनाच्या क्षेत्रातही क्रांती घडवून आणण्यासाठी ना.नितेश राणे पाऊले उचलत असून कोकणातील पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी सिंधुदुर्गातील निवती येथे देशातील पहिला ‘जलपर्यटन प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे. तसेच, मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी ‘वॉटर टॅक्सी’ आणि स्वीडनच्या हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित ‘कँडेला’ बोट सेवा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. मुंबई ते कोकण रो-रो सेवेमुळे कोकणच्या पर्यटनाला नवी झळाळी मिळणार आहे.

एकीकडे मत्स्य खाते बळकट करताना अवैध मासेमारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसवण्यात ना. राणे याना यश असल्याने महाराष्ट्राच्या सागरी मत्स्योत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. हे चित्र अत्यंत आशादायी आहे. मच्छिमारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेमार्फत १००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हा देशाच्या सागरी क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून देशाच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या भव्य प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा २६% सहभाग आहे. यातूनच राज्यात आर्थिक क्रांती घडणार आहे.

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे भौगोलिक महत्त्व ओळखून, नवीन जहाजांची बांधणी आणि जुन्या जहाजांची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी जहाज पुनर्बांधणी धोरण आखण्यात आले आहे. यामुळे सागरी व्यापार उद्योगांना मोठा प्रोत्साहन मिळणार असून, जहाज पुनर्वापरासाठी (Recycling) आवश्यक जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

मत्स्य विभागातर्फे स्टीलच्या १५ नवीन गस्ती नौका वापरल्या जाणार आहेत. ड्रोनद्वारे सुरक्षा आणि एआय (AI) यंत्रणेचा प्रभावी वापर करून परराज्यातील घुसखोर नौकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदराचा तब्बल २५ वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लावत ना. नितेश राणे यांनी तेथील अतिक्रमणे हटवून भव्य विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. यामुळे सुमारे २२.४३ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला. तर भाट्ये येथे उभारण्यात येणार बंधारा येथी मच्छीमारांसाठी उपयुक्त आहे.

ना. नितेश राणे यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निळी क्रांती अवतरली असून यातूनच भारताला महासत्ता बनण्याचे स्वप्न सत्यात उतरताना महाराष्ट्राचा मत्स्य व्यवसाय विभाग महत्वाची भूमिका बजावणार हे निश्चित आहे. यासाठी ना नितेश राणे झटून कामाला लागले आहेत.

एकीकडे मंत्रिपद तर दुसरीकडे राजकारणातील त्यांचे डावपेच विरोधकांना अचंबित करत आहेत. मंत्री आणि राजकारणी म्हणून प्रत्येक गोष्टीचा शांतपणे अभ्यास करून योग्य नियोजन करून करत असलेले त्यांचे काम आणि राजकीय डावपेच यशस्वी होत असतात.

राजकारणाचे बाळकडू जसे ना. नितेश राणे यांना माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे साहेबांकडून मिळाले तसेच प्रशासकीय शिस्तीचे धडेही त्यांच्याकडून मिळाले आहेत. हातात घेतलेल्या कामाला आर्थिक आणि वेळेची शिस्त असल्याने त्यांच्या मंत्रिकाळात अनेक कामे प्रत्यक्षात दिसू लागली आहेत. केवळ किनारपट्टीच्या नाही तर राज्यांतर्गत गोड्या पाण्यातील मासेमारीला त्यांच्यामुळे चालना मिळत आहे. जे निर्णय कधी या विभागात होतील असे वाटलेच नव्हते ते ना. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली धडक्याने होत आहेत. त्यांची धाडसी वृत्ती, प्रयोगशीलता आणि नवीन जाणून घेण्याची वृत्ती याचा एकत्रित परिणाम त्यांच्या खात्याच्या प्रगतीवर दिसून येत असून म्हणूनच हे खाते राज्यातील अन्य खात्यांपेक्षा अग्रेसर ठरले आहे.
केवळ व्यापाराच्या नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा ना. ना. राणे यांचे किनारपट्टीवर बारीक लक्ष असते. ही किनारपट्टी अवैध कामांपासून मोकळी व्हावी याला त्यांचे प्राधान्य असते. त्यांच्या या चौफेर दृष्टिकोनामुळे, धडाकेबाज कामाच्या पद्धतीमुळे धुरंधर राजकारणी सोबतच ते एक दमदार मंत्री म्हणून राज्यात आणि देशात आघाडीवर आहेत. आज ना. नितेश नारायणराव राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांचे देश, राज्य आणि समाजासाठीचे कार्य सागरासारखे अथांग असुदे याच त्यांना शुभेच्छा !