सावंतवाडी । सचिन रेडकर : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा गडद ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या विचारांचा आणि धडाडीचा समर्थ वारसा लाभलेल्या नितेश राणे यांनी केवळ वारसा चालवला नाही, तर आपल्या अनोख्या कार्यशैलीने आणि धाडसी निर्णयांनी स्वतःचे एक स्वतंत्र व अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या या झंझावाती आणि सकारात्मक प्रवासाचा घेतलेला हा धांडोळा.
नितेश राणे यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची निर्णयक्षमता. मतांच्या नफा-तोट्याची गणितं मांडत न बसता, समाजाच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते करण्याचे धाडस त्यांनी नेहमीच दाखवले आहे. जिल्ह्यातील मटका, जुगार, अमली पदार्थ अशा अवैध धंद्यांवर त्यांनी केलेली कडक कारवाई याचेच उत्तम उदाहरण आहे. युवा पिढी सुरक्षित राहावी यासाठी त्यांनी राजकीय परिणामांची तमा न बाळगता घेतलेले हे निर्णय अत्यंत कौतुकास्पद आणि स्वाभिमान वाढवणारे ठरले.
मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेले निर्णय राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरले आहेत. विशेषतः मत्स्य उत्पादनाला ‘कृषीचा दर्जा’ देण्याचा त्यांचा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे लाखो मच्छीमारांच्या जीवनात क्रांती घडणार आहे. एकीकडे पारंपरिक व्यवसायांना बळ देत असताना, दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा ‘AI’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सुसज्ज करत, जिल्हा सर्वच क्षेत्रांत अग्रेसर ठेवण्यासाठी त्यांची सुरू असलेली वाटचाल आधुनिक महाराष्ट्राचे चित्र रेखाटणारी आहे. निधी मंजूर असूनही तो वेळेत खर्च होत नाही, ही ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, सिंधुदुर्गचा अर्थसंकल्प सर्वाधिक करून, डिसेंबर महिन्यातच सर्व निधी लोकहिताच्या कामांसाठी खर्च करण्याचा त्यांचा निर्णय प्रशासनाला गती देणारा आणि इतरांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
नितेश राणे हे प्रशासनाकडून काम करून घेणारे ‘ॲक्शन ओरिएंटेड’ नेते आहेत. अधिकारी काम करत नाहीत असं तुणतुणे न वाजवता, त्यांच्याकडून वेळेत आणि दर्जेदार काम करून घेण्याची धडाडीची कार्यक्षमता त्यांच्याकडे आहे. विकासकामे केवळ नेमून दिलेल्या कालावधीतच नव्हे, तर तो कालावधी संपण्यापूर्वीच पूर्ण व्हावीत, असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम इतर जिल्ह्यांत रखडलेले असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जे वेगाने पूर्ण झाले, त्यामागे नितेश राणे यांनी भूतकाळात जनतेच्या हितासाठी केलेले आक्रमक संघर्ष आणि आंदोलनेच कारणीभूत होती, हे विरोधकही नाकारू शकत नाहीत.
विकासकामांसोबतच राजकीय पटलावर ते एक ‘धुरंधर चाणक्य’ म्हणून ओळखले जातात. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता आणि अचूक रणनीतीच्या जोरावर त्यांनी जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा बँक या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना चितपट करत एकतर्फी यश मिळवून दिले आहे. मात्र, त्यांचे राजकारण केवळ संघर्षापुरते मर्यादित नाही. जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने किंवा धरणे होण्याची वेळ येण्यापूर्वीच ते स्वतः संबंधितांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावतात, ज्यामुळे जिल्ह्यात शांतता आणि सुसंवाद टिकून राहतो.
अलीकडेच आजगाव येथील मायनिंग विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ग्रामस्थांची घेतलेली भेट आणि ‘इथे मायनिंग होणार नाहीच, मी तुमच्या सोबत आहे, आपण पर्यटनाचे प्रकल्प आणू’ हा दिलेला शब्द त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतो. स्थानिकांना सोबत घेऊन, निसर्गाची हानी न करता विकास साधण्याची त्यांची ही भूमिका सिंधुदुर्गवरील त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते सातत्याने जनतेशी जोडलेले राहून सकारात्मक उपक्रम राबवत असतात. अशा या कणखर, अभ्यासू आणि लोकहितदक्ष नेत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!












