खात्यातून परस्पर ९२ हजार रुपये डेबिट झाल्याची तक्रार दाखल ; २१ हजार ९९९ रुपये रक्कम होल्ड
आचरा प्रतिनिधी :
ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असतानाच आचरा येथील एका व्यापाऱ्याला ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय अथवा माहितीशिवाय रक्कम डेबिट झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
आचरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष तुळशीदास सामंत यांनी या आर्थिक फसवणुकीबाबत सायबर तक्रार नोंदविली आहे. तक्रारीमध्ये एकूण ९२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये बँक खात्यातून परस्पर पैसे वळते झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सायबर तक्रारीच्या नोंदीतील व्यवहाराच्या तपशिलानुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास फोनपे यूपीआयच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून १२ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, तक्रारीनुसार २१ हजार ९९९ रुपये रक्कम होल्ड करण्यात आली आहे.
या प्रकरणात क्रेडेन्शियल चोरी, बनावट ओळख अथवा ओळख चोरीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अनधिकृत लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तींना बँकिंगविषयक माहिती देणे तसेच ओटीपी किंवा यूपीआय पिन शेअर करणे टाळावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.













