सिंधुदुर्ग स्थानकावर सुरत–मंगळुरू द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला थांबा; काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

सिंधुदुर्ग, ता. 23 जून: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून रेल्वे बोर्डाने सुरत–मंगळुरू जंक्शन–सुरत द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मान्सून वेळापत्रक 2026 अंतर्गत काही गाड्यांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 19057 सुरत–मंगळुरू जंक्शन द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग स्थानकावर दर गुरुवार व सोमवार रोजी सकाळी 9.20 ते 9.22 या वेळेत थांबेल. या सेवेची अंमलबजावणी 24 जून 2026 पासून करण्यात येणार आहे.

तसेच गाडी क्रमांक 19058 मंगळुरू जंक्शन–सुरत द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस ही शुक्रवार व मंगळवार रोजी सकाळी 7.22 ते 7.24 या वेळेत सिंधुदुर्ग स्थानकावर थांबणार असून ही सेवा 25 जून 2026 पासून सुरू होणार आहे.

दरम्यान, मान्सून वेळापत्रकानुसार काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 22476 कोयंबतूर–हिसार एक्स्प्रेस या गाडीचा बिकानेर जंक्शन येथील थांबा 20 जून 2026 पासून वाढविण्यात आला आहे. तसेच 12789 काचेगुडा–कुमटा द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस या गाडीच्या भटकळ व मुरुडेश्वर स्थानकांवरील वेळांमध्ये 23 जून 2026 पासून सुधारणा करण्यात आली आहे.