मडगाव रेल्वे स्थानकावर २४ जुलै रोजी पाच तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

प्रवाशांना वेळेत स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन

मडगाव : विद्यमान पादचारी उड्डाणपूल (फूट ओव्हर ब्रिज) सुरक्षितपणे हटविण्याच्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने २४ जुलै २०२६ रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर दुपारी १२.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. स्थानकाच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा प्रकल्पाचा हा एक भाग असून या कालावधीत रेल्वे वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

 

या ब्लॉकदरम्यान मडगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वरून रेल्वेची ये-जा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत सर्व नियोजित रेल्वे गाड्यांची वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५ आणि ६ वरून करण्यात येणार आहे.

प्रवाशांनी नियोजित वेळेच्या आधीच स्थानकावर पोहोचावे, स्थानकावरील डिस्प्ले बोर्डवरील प्लॅटफॉर्मची माहिती तसेच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत आणि विनाअडथळा होण्यास मदत होईल.

ब्लॉकच्या काळात रेल्वेची सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यकारी व्यवस्था करण्यात आल्या असून प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

या अत्यावश्यक पायाभूत सुविधा विकासाच्या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल कोकण रेल्वेने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे