पोलीस आणि समाजमनाकडून कौतुकाचा वर्षाव
सावंतवाडी : निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्गाच्या भूमीत आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा सुगंध दरवळतो आहे, याची प्रचिती देणारी एक कौतुकास्पद घटना सावंतवाडी शहरात घडली आहे. आजच्या भौतिकवादी युगात जिथे प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे, अशा वेळी येथील स्थानिक महिला पत्रकार रेवती बाळकृष्ण वालावलकर यांनी स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करत समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. रस्त्यावर सापडलेली तब्बल १४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करून मूळ मालकापर्यंत पोहोचवली.
पत्रकार रेवती वालावलकर यांना सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात रस्त्यावर एक मौल्यवान सोन्याची चेन सापडली. चेन सापडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अत्यंत सजगतेने त्या परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली; मात्र तातडीने त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. अत्यंत मौल्यवान वस्तू असूनही मनात कोणताही स्वार्थ न बाळगता, रेवती यांनी सोमवारी सकाळी थेट सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे ती सोन्याची चेन सुपुर्द केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलीस प्रशासनाने भरभरून कौतुक केले व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून योग्य त्या व्यक्तीने ओळख पटवून ही चेन घेऊन जावी, असे आवाहन केले.
ही चेन सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांची होती. विठ्ठल मंदिर परिसरातच त्यांची ही चेन गहाळ झाली होती. पंचायत समिती जितेंद्र गावकर सध्या पुणे येथे ट्रेनिंगला आहेत. चेन हरवल्याच्या चिंतेत असलेले गावकर यांना जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला त्या परिसरात पाठवले. तोपर्यंत पत्रकार वालावलकर यांनी सापडलेली सोन्याची साखळी पोलिसांकडे जमा केली होती. हा धागा पकडून जितेंद्र गावकर यांच्या पत्नीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे योग्य ती ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांच्या हस्ते ती १४ ग्रॅमची चेन सौ. गावकर यांच्या स्वाधीन केली.
आपल्या पतीची गमावलेली मौल्यवान चेन सुखरूप हाती आल्यानंतर गावकर यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटून आले. त्यांनी पत्रकार रेवती वालावलकर यांच्या निस्पृह प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले.
आजच्या काळात जिथे माणूस पैशाच्या मागे धावत असताना नीतिमत्ता विसरत चालला आहे, तिथे पत्रकार रेवती वालावलकर यांनी दाखवलेले हे पाऊल समाजाला नवी दिशा देणारे आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आरसा बनणाऱ्या एका लेखणीच्या धनिनेने आपल्या कृतीतूनही समाजाची सुसंस्कृतता जपली आहे. या घटनेनंतर संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून आणि सोशल मीडियावरून रेवती वालावलकर यांच्यावर अभिनंदनाचा आणि आदराचा वर्षाव होत आहे.












