सावंतवाडी, प्रतिनिधी:

हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर, कड्याकपारीतून कोसळणारे शुभ्र धबधबे आणि धुक्याची मखमली चादर… पावसाळ्यात निसर्गाचे हे अलौकिक रूप जवळून अनुभवण्याची सुवर्णसंधी आता पर्यटकांना मिळणार आहे. वनविभाग सावंतवाडीच्या वतीने पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक अविस्मरणीय आणि सुरक्षित सफरीचा आनंद देण्यासाठी ‘निसर्गरम्य आंबोली दर्शन’ हा विशेष पर्यटन उपक्रम आगामी २७ जून २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. पावसाळी पर्यटनाला आगळीवेगळी चालना देण्याच्या आणि पर्यटकांना निसर्गाच्या कुशीत घेऊन जाण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या विशेष सफरीमध्ये आंबोली परिसरातील प्रमुख आणि मनाला भुरळ घालणाऱ्या पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फेसाळत वाहणारा प्रसिद्ध आंबोली धबधबा, निसर्गाची अथांगता दाखवणारा महादेवगड पॉईंट, पवित्र आणि शांत वातावरणातील हिरण्यकेशी मंदिर तसेच निसर्गाचे रौद्र व विलोभनीय रूप दर्शन घडवणारा कावळेसाद पॉईंट या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांचे मार्गदर्शित दर्शन पर्यटकांना घडविले जाईल. पर्यटकांचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वनविभागाने आपल्या विशेष वाहनाची सुरक्षित व आनंददायी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या उपक्रमासाठी सावंतवाडी येथील ऐतिहासिक भोसले उद्यान हे पिकअप पॉईंट निश्चित करण्यात आले असून, सफरीची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी असणार आहे. निसर्गाचा शांततेत अनुभव घेता यावा यासाठी एका फेरीत जास्तीत जास्त ८ पर्यटकांना सहभागी होता येईल, तर सफर सुरू होण्यासाठी किमान ६ पर्यटकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
वनविभागाने पर्यटकांच्या सुविधेसाठी दोन आकर्षक पॅकेजेस उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये सर्व प्रमुख स्थळांचा समावेश असलेले ‘फुल डे सफारी पॅकेज’ ३,००० रुपये प्रति ट्रिप या दरात उपलब्ध आहे, तर केवळ आंबोली धबधबा व महादेवगड पॉईंटचे दर्शन घडविणारे ‘हाफ डे सफारी पॅकेज’ २,००० रुपये प्रति ट्रिप या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पावसाच्या रिमझिम धारांमध्ये आंबोलीच्या नैसर्गिक सौंदर्याला अगदी जवळून न्याहाळता यावे, याच उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला जात असून, इच्छुक पर्यटकांनी आपली आगाऊ नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.













