१५६ गावांमध्ये सौर हायमास्ट दिव्यांनी रस्ते प्रकाशणार
पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हावासीयांकडून आभार
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी तब्बल ३९ कोटी ९६ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील २० टक्के म्हणजेच ७ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरितही करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि माध्यमातून हा विकासनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
या मंजूर निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा कायापालट केला जाणार आहे. या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
१५६ गावे होणार प्रकाशमान
या निधीचा मोठा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण भागाला होणार असून, जवळपास १५६ गावांमध्ये सौर हायमास्ट दिवे उभारण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील अंधाराचे साम्राज्य असलेल्या वस्त्या आणि भाग प्रकाशमान होण्यास मदत होणार आहे. पालकमंत्र्यांनी सुचवलेल्या शिफारशीनुसार ही सर्व विकासकामे अत्यंत गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जाणार आहेत.
जनतेकडून सरकार आणि पालकमंत्र्यांचे आभार
या मोठ्या निधीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांच्या आणि गावांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. जिल्ह्यातील दळणवळण आणि सुरक्षेच्या दृष्टीने सौर हायमास्ट दिव्यांची मोठी मदत होणार असल्याने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेमधून राज्य सरकार आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले जात आहेत.












