ओटवणे कापईवाडी येथे भरदिवसा घरफोडी

कुलूप तोडून १ लाखांची रोकड लंपास

​सावंतवाडी :
येथील कापईवाडी भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील १ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना भरदिवसा घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

​त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटवणे कापईवाडी येथील रहिवासी मधुकर चंद्रकांत चव्हाण यांचे राहते घर मंगळवारी दुपारी २ ते संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बंद होते. याच संधीचा फायदा उठवून अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाच्या बाजूच्या खोलीत ठेवलेली पहार घेतली. या पहारीने मुख्य दरवाजाच्या कुलूपावर जोराचा प्रहार करून ते तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोराने कपाटाजवळच ठेवलेली चावी शोधून काढली आणि कपाटाचे लॉकर उघडून त्यातील १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

​संध्याकाळी चव्हाण कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटल्याचे आणि कपाटातील रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा छडा लावण्यासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याद्वारे कसून तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोहकरे करीत आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोराला लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.