पारंपरिक पोषाख आणि पावसाच्या सरींवर थिरकले ख्रिस्ती बांधव
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा बिशप यांच्या हस्ते विशेष सन्मान
सावंतवाडी | प्रतिनिधी : येथील ऐतिहासिक मिलाग्रीस कॅथेड्रल (मदर चर्च) मध्ये बुधवारी पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात ‘सांत जुवाव’ अर्थात सांजांव फेस्त सोहळा संपन्न झाला. निसर्गाच्या साक्षीने आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये डोक्यावर रंगीबेरंगी फुलांचे मुकुट म्हणजेच कोपेल परिधान करून, हातामध्ये माडाचे पिढे घेत ख्रिस्ती बांधवांनी पारंपारिक कोकणी गीतांच्या आणि धुमटाच्या तालावर ठेका धरत या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
या पवित्र मिस्सा समारंभासाठी सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महाधर्मगुरू व बिशप मोस्ट रेव्ह. अग्नेलो पिन्यारो प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या मुख्य कारकिर्दीत झालेल्या या सोहळ्यात फादर मिलेट, फादर गाब्रियल, फादर अमृत, फादर ऑल्विन गोन्सालवीस आदी धर्मगुरूंनी सहकार्य केले. या प्रसंगी पेरिश कॅथेड्रल मेंबर्स, श्री. ग्रेगरी डान्टस यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मनीष दळवी, बँक संचालक रवि मडगावकर व व्हिक्टर डान्टस यांचा बिशप मोस्ट रेव्ह. अग्नेलो पिन्यारो यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मनीष दळवी यांनी बिशप यांचे विशेष आभार मानले. मिलाग्रीस चर्चच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत, चर्चच्या सर्व सामाजिक कार्याला जिल्हा बँकेच्या वतीने व वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणातून दिले.
परंपरेचा इतिहास आणि उत्साह
ख्रिस्ती बांधवांसाठी ‘सांत जुवाव’ म्हणजेच सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांचा जन्मोत्सव हा अत्यंत आनंदाचा पर्वकाळ असतो. बायबलमधील कथेनुसार, प्रभू येशूच्या (जिझस) आगमनाची वार्ता ऐकून त्यांच्या मातोश्रींच्या उदरात असलेल्या संत जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. याच घटनेचे स्मरण म्हणून या दिवशी विहिरीत किंवा पाण्याच्या स्रोतात उडी घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याची अनोखी प्रथा आहे.
या परंपरेला जपत चर्चसमोरील विस्तीर्ण मैदानावर बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच पावसाचा आनंद घेत, ढोल-ताशांच्या आणि धुमटाच्या गजरात ‘सांजांव’ची पारंपरिक गाणी गात नृत्य केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण मिलाग्रीस चर्च परिसर आणि सावंतवाडी शहर भक्तिमय व कौटुंबिक वातावरणाने न्हाऊन निघाले होते.











