देवगड l प्रतिनिधी : देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ म. ग. हायस्कूल, देवगड अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या “निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित संगणक प्रशिक्षण केंद्र” या केंद्राचा नामफलक अनावरण व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक , दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक आणि देवगड एज्युकेशन बोर्ड मुबईचे उपाध्यक्ष तसेच प्रमुख देणगीदार मा. श्री. निरंजन निळकंठ दीक्षित , देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार ,खजिनदार प्रदीप आंबेरकर , स्थानिय समिती सचिव ॲड. अविनाश माणगावकर, स्थानिय समिती उपाध्यक्षा सौ.अर्चना नेने , स्थानिय समिती खजिनदार दत्तात्रय जोशी, स्थानिय समिती सदस्य विलास रुमडे , डॉ. पुष्कर आपटे, दयानंद पाटील, आदिमान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर यांनी केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद पवार यांच्या हस्ते प्रमुख देणगीदार निरंजन दीक्षित यांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करते वेळी ॲड . अविनाश माणगावकर म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व कौशल्याचा विकास होईल असे उपक्रम संस्था नेहमी राबवत राहील तर भावी पिढी घडवायची असेल तर या आधुनिक जगात संगणक शिक्षणा शिवाय पर्याय नाही असे मत दत्तात्रय जोशी यांनी व्यक्त केले . प्रमुख देणगीदार निरंजन निळकंट दीक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाचे महत्त्व आहे .आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या संगणक प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले .
या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सागर कार्णिक यांनी केले.












