नगराध्यक्ष अवमान प्रकरण, अटी व शर्थींवर केले माफ
चिपळूण (प्रतिनिधी) : खोकेधारकास नगरपरिषद हद्दीतील खोका हस्तांतरित करण्यावरून मालमत्ता व मिळकत विभागाचे अधिकारी सागर शेडगे यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या विरोधात तक्रार केली होती. तसेच प्रसार माध्यमांशी सामोरे जाऊन नगराध्यक्षांवर आरोप केले होते. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. यावेळी शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी शेडगे यांना जोरदार धारेवर धरले. त्यानंतर शेडगे यांनी वरिष्ठ पातळीवर केलेली तक्रार गैरसमजूतीतून झाली असून नगराध्यक्षांची जाहीर माफी मागितली.
राज्य संघटने मार्फत लेखी माफिनामा द्यावा, या अटीवर नगराध्यक्ष सकपाळ यांनी शेडगे यांना माफ केले. नगरपरिषद हद्दीतील खोका परस्पर पोट खोकेधारकास हस्तांतरित केल्या प्रकरणी नगराध्यक्ष सकपाळ व शेडगे यांच्यात नगराध्यक्ष दालनातच मोठा वाद झाला होता. यानंतर शेडगे यांनी स्थानिक कामगार संघटना व राज्य कामगार संघटनेला पत्र देत याविषयी प्रसार माध्यमांवरही आक्रमक भूमिका स्पष्ट केली होती. हा वाद इतका टोकाला गेला होता की, राज्य संघटनेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला होता. मात्र याविषयी नगरसेवक निहार कोवळे यांनी सभेत मुद्दा उपस्थित करत अधिकारी शेडगे नगराध्यक्षांची जाहिर माफी मागण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिंदे सेनेचे कपिल शिर्के, अंकूश आवले, राणी महाडीक, उदय जुवळे, प्रमोद बुरटे आदींनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी राणी महाडीक म्हणाल्या, घटनास्थळी मीही उपस्थित होते. यानंतर काही वेळाने शेडगे आपल्या केबीनमध्ये येऊन माझी चुक झाली, मी नगराध्यक्षांची माफी मागायला तयार आहे, असे त्याचवेळी म्हटले. मात्र त्यानंतर हा वाद वाढत गेला, त्यामागे कोणती शक्ती होती, त्याचा उलघडा व्हावा. अखेर नगरसेवक शशिकांत मोदी, विकी नरळकर, निहार कोवळे, साजीद सरगुरोह आदींनी शहर स्मार्ट सिटी बनवायचे असेल तर प्रशासन व लोकप्रतिनीधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. शहराचे प्रथम नागरिक उमेश सकपाळ यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांची अशा पद्धतीची वागणूक कदापी खपवून घेतली जाणार नाही. मात्र काहीवेळा काम करताना चुका घडत असतात. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांसमोर जाऊन माफी मागावी, अशी मागणी केली. शेवटी नगराध्यक्ष सकपाळ यांनी शेडगे यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांना सुनावले. आता फक्त एकच गेर टाकला आहे, अजुन चार गेर बाकी आहेत. मी पाच किलोमीटर चालू शकतो, तर तुम्हाला ५० किलोमीटर पळवू देखील शकतो, असा इशारा देत याप्रकरणी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांच्या झालेल्या चुका देखील दाखवून दिल्या.













