चिपळूण (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची उत्पादने आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईचे चिपळूण पंचायत समितीने जाहीरपणे कौतुक केले. त्यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा तसेच त्यांची बदली करू नये, अशी मागणी करणारा ठराव पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी सर्वानुमते टाळयांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला. असा ठराव मंजूर करणारी चिपळूण पंचायत समिती राज्यातील पहिली पंचायत समिती ठरल्याचा दावा करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान पंचायत समितीतील ठाकरे शिवसेना उबाठाचे गटनेते गौरव पाटेकर यांनी हा ठराव सभागृहासमोर मांडला. आज तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे काहींना त्रास होत असेल, मात्र कोट्यवधी नागरिकांना भेसळयुक्त अन्नामुळे उद्भवणाऱ्या गंभीर आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्याचे मोठे काम ते करत आहेत. जनहितासाठी निर्भीडपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यांच्या बदलीचा विचार होऊ नये आणि प्रशासनात अशाच धाडसी व प्रामाणिक अधिकाऱ्यांची फळी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा पाटेकर यांनी व्यक्त केली.
या ठरावाला शिंदे शिवसेना गटनेते विनोद झगडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर संपूर्ण सभागृहाने एकमताने ठराव मंजूर करत टाळ्यांच्या कडकडाटात तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम केला. या निर्णयामुळे जनहितासाठी कठोर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी ठामपणे उभे असल्याचा संदेश गेल्याची भावना अनेक सदस्यांनी व्यक्त केली. पंचायत समितीच्या या भूमिकेची जिल्ह्यासह राज्यभर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












