सिंधुदुर्गनगरीत पतसंस्थांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न;
सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : बदलत्या कायद्यानुसार आणि काळाच्या गतीनुसार पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यावत ज्ञान प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. मागील दहा वर्षांपूर्वीचे धोरण आणि आताचे धोरण यात मोठा फरक असून, पतसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ (पुणे), जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सिंधुदुर्ग) आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले, यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, एमसीडीसीचे विभागीय समन्वयक अरुण काकडे, कोल्हापूरचे सनदी लेखापाल सुनील नागावकर, फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, सुनील नाईक, संचालक अॅड. समीर वंजारी, सुभाष चौधरी, विष्णू पराडकर, तज्ञ संचालक रमेश बोंद्रे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. कविटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आणि फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार उपस्थित होते.
पुढे बोलताना मनीष दळवी म्हणाले की, सहकारी पतसंस्था तळागाळातील लोकांची आर्थिक गरज पूर्ण करत आहेत. ही चळवळ सक्षम करण्यासाठी शासनाने विविध निकष लागू केले आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात योग्य पद्धतीने कर्जवितरण करणे गरजेचे आहे, कारण कर्जवसुली ही पतसंस्थांसमोरील मोठी समस्या असून त्यावरच संस्थेचा डोलारा उभा असतो. डिजिटल प्रणालीचा वापर केल्यास युवक वर्ग पतसंस्थांकडे आकर्षित होईल आणि कारभारात पारदर्शकता येईल.
एमसीडीसी पुणे चे समन्वयक अरुण काकडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रशिक्षणे घेतली जातात. पदाधिकारी आणि व्यवस्थापकांमध्ये संस्थेविषयी आत्मीयता असणे आणि संस्थेची प्रगती हेच ध्येय असणे आवश्यक आहे.
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट केली. देशात मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर सहकार चळवळीसमोर आव्हाने उभी राहिली, पण पतसंस्थांनी त्यांना सक्षमपणे तोंड दिले आहे. शासन स्तरावरून होणाऱ्या बदलांचा स्वीकार करणे आवश्यक असून, फेडरेशनच्या माध्यमातून सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करून जिल्ह्यातील चळवळ अधिक मजबूत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण शिबिरात कोल्हापूरचे सनदी लेखापाल सुनील नागावकर यांनी पतसंस्थांसमोरील प्राप्तिकर (इनकम टॅक्स) या विषयावर कायदेशीर व सखोल मार्गदर्शन केले. आर्थिक पत्रके बनवताना आयकर कायद्यातील तरतुदी, आयकर आकारणी आणि वजावट याबाबात त्यांनी माहिती दिली, तसेच उपस्थित पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.
जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी पतसंस्थांच्या कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याचे आवाहन करत संचालकांनी सहकार क्षेत्राबाबत प्रशिक्षित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या शिबिराला व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, विद्यासेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सांबारी, स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. उसगावकर, प.पु. भालचंद्र महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. ब्रम्हदंडे यांसह जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार यांनी केले.












