रेडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम

रेडी मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना प्रवेश दे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची घरपट्टी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी भरणार

वेंगुर्ले : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी ग्रामपंचायत ने एक आदर्शवत पाऊल उचलले असून,रेडी सरपंच , उपसरपंच,सदस्य, आजी – माजी लोकप्रतिनिधी , तंटा मुक्त अध्यक्ष यांच्या वतीने रेडी येथील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्या कुटुंबाची घरपट्टी सर्वस्वी ग्रामपंचायत ,लोकप्रतिंधी भरणार असून रेडी गावात असा एक कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे.

चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची चालू वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य ,आजी – माजी लोकप्रतिनिधी , तंटा मुक्त अध्यक्ष हे भरणार आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले की, शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविणे आणि जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या कामी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे ही सहकार्य लाभले आहे.

खाजगी शाळांच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण पडतो. अशा परिस्थितीत, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकत हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले तसेच आपण या पदावर असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे गावातील गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवदाखल विद्यार्थ्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.
रेडी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. हा उपक्रम इतर गावांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.