कोल्हापुरात शिवसेना (ठाकरे गटाला) मोठा धक्का!

शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा राजीनामा…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. इंगवले यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला असून, अंतर्गत गटबाजी व अपुऱ्या सहकार्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.

इंगवले यांनी पत्रात कोणत्याही विशिष्ट राजकीय कारणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, “एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी
सांभाळायची?” असा सवाल करत त्यांनी अंतर्गत गटबाजी आणि पक्षात मदतीचा अभाव असल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती.

राजीनाम्याच्या पत्रात इंगवले यांनी, “गेली १० वर्ष मी दोन वेळा शहरप्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. कोणतेही राजकीय विश्लेषण न करता मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे,” असा केवळ दोन ओळींचा उल्लेख केला आहे.

रविकिरण इंगवले आणि ठाकरे गटातील उपनेते संजय पवार यांच्यात पहिल्यापासूनच वाद आहे.

शिवसेना ठाकरे गटांमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समोर आला होता. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यात कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीवरून धुसफूस सुरू झाली. त्यामुळे या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. रविकिरण इंगवले आणि संजय पवार हे दोघेही कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. दोघांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र या दोघांमध्ये मेळाव्यावरून ठिणगी पडली होती.

राजीनाम्यानंतर इंगवले नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार किंवा त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार, याबद्दल कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.