सभापती शर्वरी वेल्ये व उपसभापती प्रफुल बाईत यांनी प्रत्यक्ष भेट देवून शाळेच्या स्वच्छतागृहाची केली पाहणी
ग्रामपंचायत स्तरावर तातडीने प्रस्ताव तयार करून तो शिक्षण विभागाला सादर करण्याचे दिले आदेश
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये व उपसभापती प्रफुल बाईत यांनी या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच ग्रामपंचायत स्तरावर तातडीने प्रस्ताव तयार करून तो शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजवाडी ब्राह्मणवाडी येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू आहे. मात्र, येथील स्वच्छतागृह अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबीची दखल घेत सभापती शर्वरी वेल्ये यांनी उपसभापती प्रफुल बाईत, शिक्षण विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ व पालकांच्या उपस्थितीत शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. शाळेच्या स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबद्दल खेद व्यक्त करत सभापतींनी ग्रामपंचायतीला नवीन स्वच्छतागृह उभारणीचा प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शिक्षण विभागामार्फत आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सभापती व उपसभापतींच्या या तत्परतेमुळे राजवाडी ब्राह्मणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होईल, अशी आशा आता ग्रामस्थ आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट
आम्ही केवळ जनतेच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी पदावर आहोत. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडवण्यासाठीही आम्ही कटीबध्द आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेला प्राधान्य देत तात्काळ आपण राजवाडी ब्राह्मणवाडी शाळेला भेट देवून स्वच्छतागृहाची पाहणी केली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात शिक्षण सभापतींशी चर्चा करण्यात आली असून शाळेच्या नवीन स्वच्छतागृहासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. स्वच्छतागृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
प्रफुल्ल बाईत, उपसभापती, संगमेश्वर












