गावातील मराठी माध्यमांच्या शाळेत शिकून मोठे स्वप्न बाळगा : गजानन परब

कुणकेरी आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
“गावातील मराठी माध्यमांच्या शाळेत शिकून मोठे होण्याचा अभिमान फार वेगळा आहे. मी स्वतः कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात शिकलो असून या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यात मोठे व्हायचे असेल, तर त्यांनी मोठे स्वप्न बाळगावे. तसेच पुढील शिक्षण असे घ्यावे, ज्यातून उद्योग-व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहता येईल,” असे प्रतिपादन सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी तथा शाळेचे माजी विद्यार्थी गजानन परब यांनी केले.

​कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात आयोजित दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा संघ कुडाळ संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव उत्तम सराफदार, शाळा समिती सदस्य शांताराम परब, पांडुरंग परब, आंबेगावचे सरपंच श्री. परब, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, वाडोस हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास आंबेस्कर, माजी मुख्याध्यापक भरत सराफदार, पालक श्रीमती जोशी व श्रीमती परब आदि मान्यवर उपस्थित होते.

​पुढे बोलताना गजानन परब म्हणाले की, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गावाबाहेरील शाळेचा मोह टाळायला हवा. गावाबाहेर जाऊन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्याने वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. आपल्या गावची शाळा हे आपले भूषण असून मुलांनी आपल्या गावातच शिक्षण घेतले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर शांताराम परब व पांडुरंग परब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

​ या सोहळ्यात दहावी परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेला प्रणय सिताराम परब, द्वितीय आलेला सोहम गंगाराम गावडे आणि तृतीय क्रमांक पटकावलेला सूर्यकांत अंकुश जोशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, सचिव उत्तम सराफदार व प्रमुख पाहुणे गजानन परब यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रणय परब व सूर्यकांत जोशी यांनी, “शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो, शाळेचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही. पुढील शिक्षण घेऊन गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल करू,” असा विश्वास व्यक्त केला.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी केले, तर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत भरत सराफदार यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विद्यार्थिनी सानिका कुंभार हिने केले, तर विद्या जंगले हिने उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षक श्री. राऊळ, कर्मचारी अनिल परब, राजन गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.