फिटनेस योग फाऊंडेशनचा पुढाकार
सावंतवाडी:
“स्वस्थ शरीर, शांत मन, सशक्त भारत” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या फिटनेस योग फाऊंडेशनतर्फे सावंतवाडीत १०० तासांचे भव्य योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उत्तम समाज निर्माणासाठी उत्तम योगशिक्षक घडवणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याची माहिती फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष श्री. शैलेश बांदेकर यांनी दिली आहे.
हे शिबिर ३० जून ते ३० जुलै या कालावधीत जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. या शिबिरात योगप्रेमींना वेळेची अचूक सांगड घालता यावी यासाठी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये सकाळचे प्रात्यक्षिक सत्र पहाटे ५:३० ते सकाळी ७:३० वाजेपर्यंत चालेल, तर संध्याकाळचे थेअरी सत्र रात्री ७:०० ते ८:३० या वेळेत घेतले जाईल. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात केवळ योगासनेच नव्हे, तर प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद, एक्यूप्रेशर, मानसिक आरोग्य तसेच एक उत्तम योग शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फिटनेस योग फाउंडेशनतर्फे अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ज्यांना योग क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे किंवा योगाचा प्रचार-प्रसार करायचा आहे, अशा इच्छुकांनी ३० जून २०२६ पूर्वी आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष श्री. विशाल लातये (९५४५४७६१७०) किंवा फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष श्री. नारायण सावंत (९४२३३२०४७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













