लोहगड किल्ल्यावर उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हा कट आधीच आखल्याचे उघड झाले आहे. घटनेपूर्वी लोहगड परिसराची रेकी करण्यात आल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड आणि चॅट डिलीट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हत्येपूर्वी लोहगड परिसराची केली होती रेकी
लोहगड : ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर घडलेल्या उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हा खून पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेपूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्याची रेकी केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्यासाठी दोघांनी मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड आणि चॅट डिलीट केल्याचेही उघड झाले आहे.
१८ जून रोजी केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे दोघे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्याच दिवशी केतनला दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. काही तासांतच ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
नीरज कुमार ठरणार महत्त्वाचा साक्षीदार
पोलिसांच्या तपासात मे महिन्यापासून या हत्येचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी आरोपींनी मोबाईलमधील कॉल हिस्ट्री आणि मेसेज हटवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांचेही मोबाईल न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यातून आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरणार आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घटनेच्या दिवशी नीरज आणि चेतन यांनी मोबाईलची अदलाबदल केली होती. दिवसभर नीरजने चेतनचा मोबाईल वापरला, तर चेतन नीरजचा मोबाईल घेऊन लोहगड येथे गेला होता. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात हा बनाव उघड झाला.
दरम्यान, सिया गोयलच्या आईने देखील मुलीच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. केतन अग्रवाल याला ज्या पद्धतीने दरीत ढकलून ठार करण्यात आले, त्याचप्रमाणे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.









