मळेवाड येथे वळणावर पीकअप घसरून अपघात

सुदैवाने तिघेही प्रवासी सुखरूप ;वाहनाचे मोठे नुकसान

​न्हावेली । प्रतिनिधी :
दोडामार्गहून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी पीकअप वाहनाला मळेवाड प्राथमिक शाळेजवळील धोकादायक वळणावर भीषण अपघात घडल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून गाडी घसरल्याने हा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातातून वाहनातील तिन्ही प्रवासी बालंबाल बचावले असून केवळ दैवबलवत्तर म्हणूनच मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
​सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी एक चारचाकी पीकअप गाडी दोडामार्गवरून शिरोड्याकडे जात होती. मळेवाड प्राथमिक शाळेजवळ असणाऱ्या वळणावर गाडी आली असता, पावसाने निसरड्या बनलेल्या रस्त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अचानक गाडी स्लीप होऊन थेट बाजूच्या गटारात जाऊन कलंडली. अपघात होताच झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

​ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत गाडीत अडकलेल्या प्रवाशांना तातडीने बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच असलेल्या मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मसके यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले.

​या अपघातात दीपक नाईक (वय ४६, रा. शिरोडा) आणि ऋषिकेश कासकर (वय ३१, रा. आरवली) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने गाडीतील सर्वजण सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळल्याने मळेवाड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या अपघातामुळे मळेवाड येथील वळणावरील रस्त्यांच्या सुरक्षेचा आणि पावसाळ्यातील निसरड्या रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.