स्वप्निल कदम -कुडाळ :
देशव्यापी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर (तेर्सेबांबर्डे आरोग्य उपकेंद्र), बांबर्डे तर्फ माणगाव येथे रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ‘पोलिओमुक्त भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद माणगाव विभागाचे सदस्य रुपेश कानडे यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच धनश्री गवस, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मेस्त्री, अजय डिचोलकर, संतोष डिचोलकर, गुणाजी जाधव, माधवी कानडे, प्रणाली साटेलकर आणि रोहिणी हळदणकर यांच्यासह ग्रामस्थ व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येत असून, प्रत्येक बालकापर्यंत ही लस पोहोचविण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी “आपले दोन थेंब, देशाचे संरक्षण – निरोगी बालक, समृद्ध भारत” या संदेशाचा पुनरुच्चार करत परिसरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
ही मोहीम आयुष्मान आरोग्य मंदिर, बांबर्डे तर्फ माणगाव आणि ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.













