पंधरा-वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची रिमझिम; कोकणात भातशेतीच्या नांगरणीला सुरुवात

सावंतवाडी :यंदा मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने कोकणातील शेतकरी चिंतेत होता. त्यातच तब्बल पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारल्याने भातशेतीची कामे खोळंबली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीत आवश्यक ओल निर्माण झाली असून, बळीराजाने आता भातशेतीच्या नांगरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात पुन्हा एकदा बैलजोडीच्या पावलांनी कृषी संस्कृती जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोकणातील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने प्रत्येक सरीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले असतात. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे थांबवून ठेवली होती. आता मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावताच शेतकरी शेतात उतरला असून, बैलजोडीला जुंपून नांगरणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. हिरवाईने नटू लागलेल्या शिवारात चिखलमय मातीत नांगर हाकणारा बळीराजा आणि त्याच्या साथीला असलेली बैलजोडी हे दृश्य ग्रामीण जीवनाचे आणि कोकणच्या कृषी परंपरेचे जिवंत दर्शन घडवत आहे.

यंत्रांच्या युगातही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने मशागत करताना दिसत आहेत. नांगरणी पूर्ण झाल्यानंतर शेत तयार करून भात लागवडीची तयारी केली जाणार आहे. पुढील काही दिवस पावसाने अशीच साथ दिल्यास तरवा तयार झाल्यावर भाताची रोपे शेतात लावण्याच्या कामाला म्हणजेच लावणी लाही वेग येणार असून, यंदा चांगल्या उत्पादनाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

रिमझिम पावसाच्या सरी, हिरवाईने बहरलेले शिवार, बैलांच्या पावलांनी उमटणाऱ्या नांगराच्या रेषा आणि मातीत घाम गाळणारा बळीराजा हे चित्र कोकणच्या कृषी संस्कृतीचे सौंदर्य अधिक खुलवणारे ठरत आहे. पावसाने पुन्हा दिलेल्या या दिलाशामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, समृद्ध भातपिकाच्या आशेने प्रत्येक शेतकरी नव्या उत्साहाने कामाला लागला आहे.