वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; एकही बालक वंचित राहू नये – रुपेश पावसकर

कुडाळ :           तालुक्यातील वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यानंतर त्यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजून मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुक्यातील एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच बाहेरगावी गेलेल्या पालकांशी व ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांच्या बालकांचे पोलिओ लसीकरण झाले आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

“पोलिओमुक्त जिल्हा कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला वेळेत पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. तसेच इतर संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठीही वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन पावसकर यांनी केले.

या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिओ निर्मूलनासाठी शासनाच्या या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.