४३ वर्षांनंतर माजी विद्यार्थी सामाजिक कृतज्ञतेसाठी एकत्र
सावंतवाडी । प्रतिनिधी :शाळा, गाव आणि समाज यांचे आपण काहीतरी देणे लागतो या पवित्र भावनेतून मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९८२/८३ च्या SSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवला. एसएससीनंतर तब्बल ४३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश देत सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली.
दि. १३ जून २०२६ रोजी नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मळगावचे ग्रामदैवत श्री भूतनाथ मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. शरद शिरोडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गोविंद मोर्ये आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. नूतन बांदेकर यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम साकारण्यात आला. या प्रसंगी मंदिर परिसरात १० नारळ, २५ सुपारी आणि २ सोनचाफ्याची रोपे लावून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देण्यात आला. “हा उपक्रम म्हणजे समाजासमोर एक उत्तम उदाहरण असून, वर्गमित्रांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच हे विधायक कार्य शक्य झाले,” असे प्रतिपादन डॉ. शरद शिरोडकर यांनी केले. देवस्थानचे पदाधिकारी गुरू गावकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक करत, इतर आजी-माजी विद्यार्थ्यांनीही हाच आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मळगाव देवस्थानचे पदाधिकारी श्रीधर गावकर, काका गावकर, गुरू गावकर, महेश गावकर तसेच माजी विद्यार्थी उदय सावळ, दिलीप खडपकर, भरत जाधव, शरद शिरोडकर, गोविंद मोर्ये, नूतन बांदेकर, सुनील गाड, रवींद्र माळकर, मानवेल डिसोजा, विजय हरमलकर, विश्वनाथ राऊळ, संजय धुरी, रामदास पांगम आणि शोभा कुडव उपस्थित होते. तसेच या उपक्रमासाठी दिगंबर शेटकर, रवी मांजरेकर, रवींद्र मळगावकर, सुमन खडपकर, सुहासिनी सावंत, उषा राऊळ, नयन परब, रामा जाधव, रवींद्र प्रभू, मंदा नाईक, प्रशांत राऊळ, लक्ष्मण राऊळ, छाया नार्वेकर, शकुंतला नाईक आणि आरती नार्वेकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले. सर्वच स्तरांतून या बॅचच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.













