राजापूरात शिवराज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
राजापूर (वार्ताहर) : न्याय, धर्म, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी स्वराज्याचे आदर्श प्रस्थापित करुन, शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या नवनिर्मितीचा बोध आजच्या दिनी हिंदूंनी घ्यायला हवा आणि जाती पातीच्या जोखडातून मुक्त होत. एक हिंदु म्हणून संघटीत व्हायला हवे असे आग्रही प्रतिपादन व्याख्याते प्रभात मेस्त्री यांनी येथे केले.
जेष्ठ शुध्द त्रयोदशीचे औचित्य साधून शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन तथा हिंदु साम्राज्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी हिंदु साम्राज्य दिन बोध नवनिर्मितीचा या विषयावर प्रभात मेस्त्री यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
हजारो वर्षाच्या गुलामगिरी नंतर, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या रयतेच्या राजाच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिन, जेष्ठ शुध्द त्रयोदशी, शिवशक ३५३ रोजी साजरा केला जातो. या सुवर्णक्षणाचे स्मरण करण्यासाठी, ऐतिहासिक अश्या राजापूरातील शिवतीर्थावरील शिवस्मारक येथील शिवरायांच्या मुर्तीची पाद्यपूजा व अभिषेक, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. गोपाळ पाध्ये गुरुजी यांनी पौरोहित्य केले व शिवछत्रपतींची शिवपूजा करुन घेतली. यानंतर शिवरायांची आरती व जयघोष करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने शिवतीर्थ दणाणले.
यानंतर शिवभक्त प्रसाद शेवडे, महेश मयेकर आणि अभिजित गुरव यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व शिवभक्त राज्याभिषेकादिना निमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, संघ कार्यालय या ठिकाणी एकत्रित झाले.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या वीरासनातील शिवमुर्तीला शिवभक्त मोहन घुमे यांच्या हातून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शिवभक्त तेजस नार्वेकर यांने ध्येय मंत्र सांगितला. या राज्याभिषेक दिनाचे व्याख्याते प्रभात मेस्त्री यांचा सन्मान राजेद्र कुशे यांनी शाल श्रीफळ देऊन केला. यानंतर हिंदु साम्राज्य दिन बोध नवनिर्मितीचा या विषयावरील व्याख्यानाला सुरवात झाली.
या वेळी आपल्या अमोघ वाणीने व्याख्याते प्रभात मेस्त्री यांनी उपस्थित शिवभक्तांना छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य निर्मितीचे कार्य, शिवरायांचे गुणविषेश, अचाट धैर्य व धाडस सांगत मार्गदर्शन केले. यामध्ये त्यानी शिवरायांनी रायरेश्वराच्या चरणी हे राज्य व्हावे हि श्रींची ईच्छा असे म्हणत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि हा स्वराज्याचा लढा उभा करतांना वेचलेले मावळे आणि त्यांची स्वराज्य निष्ठा, स्वराज्यासाठी त्यांनी दिलेलं प्राणांचे बलिदान, त्यातुन शिवरायांच्या प्रति असलेली स्वामी निष्ठा, आणि या सर्वांच्या साथीने शिवरायांनी पाच पातशाह्यांना, गनिमी कावाच्या माध्यमातून धुळ चारत, प्रसंगी प्रसंगावधान दाखवत, कधी तहाच्या माध्यमातून मुत्सद्धेगिरी करून, स्वराज्याचा विस्तार केला आणि रयतेचे राज्य निर्माण केलं. आणि या राज्याला राजा हवा म्हणून स्वतःला राज्याभिषेक करुन, पुन्हा एकदा गुलामगिरीत पिचलेल्या आणि त्रासलेल्या हिंदुंना मुक्त करत, हिंदु साम्राज्य निर्माण केलं. तो हा आजचा दिवस, हिंदु संस्कृती आणि परंपरांचे रक्षण केले. न्याय, धर्म, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी स्वराज्याचे आदर्श प्रस्थापित करुन, शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या नवनिर्मितीचा बोध आजच्या दिनी हिंदूंनी घ्यायला हवा आणि जाती पातीच्या जोखडातून मुक्त होत. एक हिंदु म्हणून संघटीत व्हायला हवे, सर्व हिंदुत्ववादी संघटनानी एकत्र येत, संघटीत होऊन, सकल हिंदु समाजाची ताकद वाढवायला हवी. असे आवाहन करत व्याख्यानाची सांगता केली.
यानंतर शिवकन्या कौशिकी करंबेळकर हिने प्रेरणा मंत्र सांगितला आणि त्यानंतर जाहले शिवाजी, छत्रपती महाराज हे शिवराज्याभिषेकावरील गीत बाल शिलेदारांनी सामुदायिक रित्या सादर केले. कार्यक्रमाचा शेवटी आई तुळजा भवानीला वंदन करुन, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना स्मरून हिंदु धर्माचे संवर्धन आणि रक्षणाची शपथ घेण्यात आली. ३५३ वर्षापूर्वी आजच्या तिथीला शिवाजी महाराज छत्रपती झाले, याचा आनंद म्हणून गोड बुंदी लाडू वाटून रयतेच्या राजाचा हा लोकोत्सव, सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदु समाज राजापूर यांच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शुभम कुशे यानी केले. तर कार्यक्रमाच्या उद्देशाची प्रस्तावना महेश मयेकर यांनी केली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अभिजित नार्वेकर, संदेश टिळेकर, केदार साने, सुषांत बाकाळकर, अभिजित पवार, निकेश पांचाळ, आदित्य नार्वेकर या शिलेदारांनी विशेष मेहनत घेतली.
Home महत्वाच्या बातम्या जाती पातीच्या जोखडातून मुक्त होत, हिंदुंनी हिंदु म्हणून संघटीत व्हायला हवे-प्रभात मेस्त्री













