पंढरीची वारी:  एक अविस्मरणीय आध्यात्मिक भक्तीप्रवास 

महाराष्ट्र ही संतांची आणि अखंड भक्तीने पावन झालेली भूमी आहे. या भूमीच्या परंपरेचा आणि अध्यात्माचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. दरवर्षी ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय वातावरणामध्ये दंग होऊन जातो. मानवी भावना, शिस्त, भक्ती आणि निसर्गाचे मोहून टाकणारे रुप वारीमध्ये अनुभवायला मिळते.

देशभरातील सर्वात मोठा आणि शिस्तबद्ध मानवी उत्सव म्हणून पंढरपूर वारीकडे पाहिले जाते. दरवर्षी आषाढी वारीच्यानिमित्ताने लाखो वारकरी विठुरायाचे नामस्मरण करत शेकडो किलोमीटरची पायपीट करतात. केवळ विठुरायाच्या भेटीसाठी वय, जात, धर्म, भाषा, हे सर्व भेद विसरून लाखो लोक एकाच ध्येयाने प्रवास करत असतात. पायी चालत चालत पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकरी विठ्ठलभक्ती, समता, सेवा आणि मानवतेचा संदेश देत असतो.

एका पर्यटकाच्या दृष्टीने तर वारी अनुभवणे म्हणजे सुखाचा सोहळा आहे. परदेशातून तसेच देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आषाढी वारीमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे अभूतपूर्व दर्शन घडते. ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून जाणारा परिसर पर्यटकांना भक्तीमय वातावरणामध्ये घेऊन जातो.

वारीची खरी सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (देहू) यांच्या प्रस्थानाने होते. हजारो वारकरी, हातात टाळ-मृदंग, खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करतात. अशावेळी संपूर्ण परिसरामध्ये सकारात्मक उर्जा जाणवते. रंगीबेरंगी पोशाख, कपाळी चंदनाचा टिळा लावलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान अनुभवताना मन हरवून जाते. वारी अनुभवण्यासाठी तसेच प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठ्या संख्येने छायाचित्रकार, पर्यटक गर्दी करतात.

वारीदरम्यान होणारे रिंगण सर्वात मोठे आकर्षण असते. वारकऱ्यांनी तयार केलेले एक मोठे वर्तुळ म्हणजे रिंगण. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. त्यानंतर नामगजरास सुरुवात होते. टाळ-मृदुंगाच्या एकाच तालात वारकरी ठेका धरतात. या तालातच भरधाव वेगाने दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन करतो. टाळ-मृदुंगाचा वेग, जयजयकार आणि वाऱ्याच्या वेगाने धावणारा अश्व हे सारे दृश्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लाखोंची गर्दी जमा होते. अश्व धावून गेल्यानंतर त्याच्या टापांखालील माती कपाळाला लावण्यासाठी भाविक आतुर होतात. याशिवाय ‘उभे रिंगण’ आणि ‘आडवे रिंगण’ तयार करुन यामध्ये वारकरी फुगड्या खेळतात, धावण्याच्या स्पर्धा आयोजित करतात आणि वेगवेगळ्या पारंपरिक लोककला सादर करतात.

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून आणि सासवडच्या दिवे घाटातून वारीचा प्रवास सुरु असतो. विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी दिवे घाटातून मार्गस्थ होत असतानाचे दृश्य स्वर्ग सुखाचा अनुभव देते. पावसाच्या हलक्या सरी, सर्वत्र पसरलेली हिरवळ, डोंगर-रागांमधून वाहणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्यामधून वाट काढत जाणारे वारकरी हे सारे क्षण डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासारखे असतात. एखाद्या ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेमधून दिवे घाटाचा परिसर पाहताना भक्ती आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो.

विठ्ठल नामाच्या गजरात स्वतःला विसरून जाणारे वारकरी, भारतीय अध्यात्म, लोकसंस्कृती आणि संत परंपरा जवळून अनुभवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकही वारीमध्ये सहभागी होतात. एकता, सेवाभाव, श्रद्धा, अध्यात्म हाच जीवनातील खरा आनंद आहे हे वारी आपल्याला आपसुकच शिकवते. पांडुरंगाच्या ओढीने सुरु झालेला हा प्रवास प्रत्येकाला आत्मचिंतन करण्याची संधी देतो आणि यामधूनच आध्यात्माची गोडी निर्माण होते.

पंढरपूर वारीच्या निमित्ताने पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण आध्यात्मिक वैभवाचा प्रवास अनुभवता येतो. विठुरायच्या भेटीबरोबरच अनेक महत्त्वाची आध्यात्मिक स्थळे पाहता येतात. देहू आणि आळंदी ही संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची पुण्यभूमी वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी देतात. त्यानंतर अष्टविनायकाचे मुख्य पीठ असलेल्या मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन हा प्रवास पुढे सुरु राहतो. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत जेजुरी गडावर नतमस्तक होऊन पुढचा प्रवास करता येतो. सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, गाणगापूर येथील दत्तसंप्रदायाचे पवित्र क्षेत्र ही जागृत देवस्थाने आध्यात्मिक भव्यता द्विगुणित करतात. अखेरीस पंढरी नगरी गाठल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे रुप डोळ भरुन पाहण्याबरोबरच संत नामदेव पायरी, पुंडलिक मंदिर, चंद्रभागा नदी घाट, गोपाळपूर यांना भेट देता येते. पंढरपूर वारीकडे फक्त धार्मिक यात्रा म्हणून न पाहता यामधून महाराष्ट्राच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे अविस्मरणीय दर्शन घडते.

आमच्या बद्दल:

 

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २०१६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.

 

सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.