मालवण | प्रतिनिधी : मालवण घुमडे येथील सुरेश ज्ञानोबा बाईत (वय 65) हे 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजता कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. ते पुन्हा घरी आलेच नाही. त्यांचा शोध घेतला असता कोणताही शोध न लागल्याने त्यांचा मुलगा सिद्देश सुरेश बाईत यांनी वडील बेपत्ता असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार बेपत्ता नोंद करून पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.
सिद्देश याने पोलीस ठाण्यात माहिती देताना सांगितले, वडील सुरेश बाईत हे 20 वर्षांपासून मानसिक दृष्ट्या आजारी आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी व ओरोस येथे उपचार सुरु आहेत. ते कधीतरी मासेमारीचे काम करण्यासाठी दांडी येथील मेस्त यांच्या रापणीवर जातात. परत दुसऱ्या दिवशी घरी येतात. 4 जुलै रोजी दुपारी कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. ते दुसऱ्या दिवशीही परत न आल्याने दांडी येथील मेस्त यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी 4 दिवस रापणच लावली नसल्याचे सांगितले. तसेच तुमचे वडिलही आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र शोध करूनही वडिलांचा कुठेच शोध न लागल्याने याबाबत माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.












