सावंतवाडी:
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी किशोर चिटणीस यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये तत्कालीन अध्यक्ष ओंकार तुळसुलकर यांनी वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाची धुरा आतापर्यंत डॉ. प्रसाद नावेँकर यांनी सांभाळली होती. आता संस्थेच्या नव्या वाटचालीसाठी चिटणीस यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या निवडीसोबतच संस्थेच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्षपदी डॉ. प्रसाद नावेँकर, सचिवपदी अण्णा म्हापसेकर, खजिनदारपदी जितेंद्र ऊर्फ जितू मोरजकर तर सहसचिवपदी राजू केळुसकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष किशोर चिटणीस यांनी सांगितले की, संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.
पक्षविरहित पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या अभिनव फाऊंडेशनमार्फत येत्या काळात जनतेच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील, असा विश्वासही चिटणीस यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात झालेल्या अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने सन २००८ पासून जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. यामध्ये माठेवाडा येथील स्पर्धा परीक्षाविषयक अभ्यासिका, आरोग्यविषयक जनहित याचिका, ‘आठवणीतले खेळ’ हा अनोखा उपक्रम, रुग्णवाहिका सेवा आणि नरेंद्र डोंगरावरील बिजारोपण अशा अनेक उल्लेखनीय व लोकहितैषी कार्यांचा समावेश आहे. नवनवीन उपक्रमांसह संस्था आपले हे सामाजिक दायित्व पुढेही अविरतपणे चालू ठेवणार आहे.













