खांबाळे येथे मराठी चित्रपट महामंडळाचे सहकार्यवाह श्री. कदम यांचा सत्कार
वैभववाडी l प्रतिनिधी : कोकणात अनेक कलाकार आहेत. परंतु त्यांच्यापर्यत ते चित्रपट महामंडळापर्यत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या महामंडळाचा सहकार्यवाह म्हणुन कोकणातील प्रत्येक कलाकारांपर्यत महामंडळ पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळांचे सह कार्यवाह तथा सिने दिग्दर्शक दिपक कदम यांनी येथे व्यक्त केले.
महामंडळाच्या सहकार्यवाहपदी निवड झाल्यानतंर ते आपल्या मुळगावी खांबाळे येथे आले होते. त्यांचा संपुर्ण ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगूच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मंगेश कदम, पांडुरंग गुरव, शांताराम पवार, दिपक चव्हाण, महेश चव्हाण, गुरूनाथ गुरव, मारूती मांजलकर, विठोबा सुतार, मंगेश गुरव, महेश लांजवळ, अंबाजी पवार, मेघनेष पवार, योगेश परब, वैभव पवार, श्याम पवार, दिनेश पालकर, रोहीत पवार आदी उपस्थित होते.
श्री.कदम म्हणाले, अखिल मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मला समर्थ पॅनेलमध्ये दिग्दर्शक गटातुन संधी देण्यात आली. खरे तर ही संधी मला कोकण म्हणुनच मिळाली. या निवडणुकीत आमचे पुर्ण पॅनेल बहुमताने निवडुन आले. त्यानतंर पदाधिकारी निवडीत माझ्यावर सहकार्यवाह पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संपुर्ण कोकणातुन मी महामंडळात प्रतिनिधीत्व करीत आहे. महामंडळाच्या सक्रीय ४५ हजार सभासदांमध्ये सिंधुदुर्गचे केवळ आठ ते दहाच सदस्य आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक गुणी कलावंत आहेत. वर्षानुवर्षी ते जिल्हयात काम करीत आहेत. परंतु ते कधी महामंडळापर्यत पोहोचले नाहीत किवा महामंडळ त्यांच्यापर्यत पोहोचले नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यापर्यत पोहोचण्याचा पहिला प्रयत्न आपण प्रयत्न करणार आहे. कोकणातील कलाकारांना सभासद करण्यासाठी देखील प्रयत्न जाणार आहेत. याशिवाय कोकणात महामंडळाचे कार्यालय सुरू करण्याचा माझा विशेष आग्रह असणार आहे. तशाप्रकारचा ठराव पहिल्याच बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई ही जरी आता कर्मभुमी असली तरी कलेचे धडे जन्मभुमीतुनच गिरविले आहेत. त्यामुळे त्याच जन्मभुमीतील कलाकारांसाठी मी अधिक वेळ देणार असल्याचे श्री.कदम यांनी स्पष्ट केले.













