कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
वैभववाडी प्रतिनिधी :
नाधवडे गावचे सुपुत्र परशुराम इस्वलकर यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ), कोल्हापूर यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. याच उपक्रमांतर्गत परशुराम इस्वलकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
नाधवडे गावात तंटामुक्ती अध्यक्ष पदावर गेले अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. गावातील तंटे सामंजस्याने मिटवण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. तसेच गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यानी मदतीचा हात कायम दिला आहे. गावातील सामाजिक संघटना व मंडळामध्ये प्रमुख पदावर ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा नेहमी पुढाकार राहिला आहे.
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, दत्तात्रय सूर्यवंशी, सुनील नारकर, भारत माळी, एन. बी. मगदूम, शशिकांत मेहतर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ. श्रावणी रावराणे, बाप्पी मांजरेकर, डी. एस. पाटील, मंगेश घाडी, साहित्यिक सिताराम कुऱ्हाडे, उद्योजक डॉ. एम. बी. शेख, राजदीप सुर्वे, रंगराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.












