भात लावणीत यंत्रांचा बोलबाला; बियाणेही संकरित; नांगरणीसाठी सऱ्हास पाँवर टिलरचा वापर

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यात भात लावणीच्या कामाला वेग आला असून सध्या पारंपरिक पध्दतीला आधुनिकतेची जोड देऊन शेती करताना ९० टक्के संकरित बियाणे वापरण्यात येत आहेत. नांगरणीसाठी पॉवर टिलरच शेतीत दिसून येत आहे.

पावसाने यावर्षी वेळेत हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. पेरणीही वेळेत झाली होती. आतापर्यंत पावसाची कामगिरी समाधानकारक आहे. मात्र, आता लावणीला जोरदार सुरवात झाल्याने पावसात सातत्य गरजेचे आहे. रविवार पासून सुरू झालेल्या पावसाने शेतजमिनीत उमाळे फुटल्याने शेतकरी समाधानी आहे. यावर्षी पावसाने बरोबर मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात एन्ट्री घेतली. त्यामुळे पाऊस चांगला होईल, असे मत पारंपरिक शेतकरी व्यक्त करत आहेत.

यंदा एकमिरगी सुरवात झाली आहे, असे स्थानिकांच्या भाषेत बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांत रोपं लावणीच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार पावसाची गरज होती. त्याप्रमाणे गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे नदी, ओहोळ तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस होऊन पीक चांगले येईल, अशी आशा आहे. पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी अद्याप वातावरणात थंडावा आलेला नाही. सध्या पडत असलेला पाऊस शेतीसाठी पुरक असला तरी येत्या काही दिवसांत रोपं लावणीच्या कामाला सुरुवात झाल्याने यावेळी मुबलक पावसाची गरज आहे.

मासळी बाजार थंडावले
खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने सध्या खवय्यांची पंचायत होत असून पर्यायी सुकी मासळी किंवा नदीतील मासे भाव वाढला आहे. परिणामी मासळी बाजार थंडावले आहेत.