सामाजिक, शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्त्याची निवड, गणेश साळुंखे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील भांबेड येथील भांबेड पंचकोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि कोर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेश साळुंखे यांची नुकतीच निवड झाली आहे.
गणेश साळुंखे हे कोर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना दरवर्षी ते विविध शाळा, हायस्कूल यांना शैक्षणिक तसेच आर्थिक स्वरूपात देणगी देखील देत असतात. दरवर्षी ते मोतीबिंदूचा कॅम्प आयोजित करतात. या कँप द्वारे समाजातील गोर गरीब असणाऱ्या अशा ११ व्यक्तीचे ते स्वखर्चाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतात.
कोविडच्या काळात देखील गणेश साळुंखे यांनी स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात अन्नधान्याच्या किटच्या वाटप केले होते. गोरगरीब जनतेसाठी त्या काळात गणेश साळुंखे यांची किट खूप महत्त्वाची ठरली होती. याबरोबरच सध्याच्या काळात महिला आणि मुलींसाठी स्वसंरक्षण करणे ही गरज बनली आहे. म्हणूनच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने तालुक्यातील १८ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले होते. राष्ट्रीय कराटे चॅम्पियन पट्टू तेजस्विनी आचरेकर हीच्या माध्यमातून हे कराटे प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय गणेश साळुंखे पंचक्रशीतील विविध मंदिरांना देखील सढळ हस्ते देणगी देत असतात.
अशाप्रकारे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या गणेश साळुंखे यांची नुकतीच भांबेड पंचकोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी असलेल्या व्यक्तीची भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था या नावाजलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.













