गुहागर प्रतिनिधी:
हरितक्रांतीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बचत गटांच्या सहभागातून तब्बल 10 एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु करण्यात आला. नाचणी व विविध फळभाजी पिकांच्या लागवडीचा शुभारंभ करत ग्रामीण भागात सामूहिक शेतीचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
गुहागर पंचायत समिती, तालुका कृषि विभाग आणि ग्रामपंचायत उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी सामूहिक शेती हा ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारा उपक्रम असल्याचे सांगितले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, शेतकऱ्यांना उत्पन्नवाढ आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. यावेळी उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, नेत्राताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, गौरव वेल्हाळ, मानसी रांगळे तसेच उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर उपस्थित होते.
कृषिदिनानिमित्त गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ‘गोकृपा अमृतम’ या सेंद्रिय द्रावणाची निर्मिती व वापराचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर करण्यात आले. सेंद्रिय शेतीचे वाढते महत्त्व आणि रासायनिक शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर, कृषि अधिकारी कृष्णदेव कदम, मंडळ कृषि अधिकारी नाले, सर्जेराव कांबळे, मंगेश पिंगळे, विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, कृषि पर्यवेक्षक कुसाळकर यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी केली, तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश लेंडवे यांनी केले.













