असनिये-कनेवाडी येथे रस्त्यालगतची घाळ कोसळली

जेसीबीने पोखरल्यामुळे दुर्घटना झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील असनिये-कनेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना टळली. येथील रस्त्यालगत असलेली एक मोठी घाळ ( दरड ) अचानक कोसळली. ही घाळ स्थानिक रहिवासी प्रवीण नारायण ठीकर यांच्या मालकीची असल्याचे समोर आले असून, सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने, घाळ कोसळली तेव्हा परिसरात कोणीही नसून मोठी जीवितहानी टळली आहे.

या घटनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भागात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्ता रुंदीकरण आणि गटाराच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी जेसीबीच्या साहाय्याने ही घाळ मोठ्या प्रमाणात पोखरण्यात आली होती. पाया कमकुवत झाल्यामुळेच ही घाळ कोसळल्याचा थेट दावा ग्रामस्थांनी केला आहे.

घाळ कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच असणिये-कनेवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेली झाडे, मोठे दगड आणि माती बाजूला सारली व वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

दरम्यान, वाहतूक सुरू झाली असली तरी या भागातील डोंगर किंवा घाळीचा आणखी काही भाग कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.