देवरूख विभागातील पोलीस पाटील समूहाने पाटगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षलागवड हा आगळावेगळा कार्यक्रम घेवून पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल पोलीस पाटील समूहावर उधळली स्तुतीसुमने

निलेश जाधव / देवरूख:

पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल पुन्हा सुरळीत व्हावा, या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील समूह देवरूख पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या देवरूख विभागातील पोलीस पाटील समूहाच्यावतीने गुरूवारी पाटगाव येथे सांब मंदिर परिसरात वृक्षदिंडी व वृक्षलागवड हा आगळावेगळा कार्यक्रम घेवून एकप्रकारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. हा अनोखा परंतु तितकाच स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी पोलीस पाटील समूहावर आपल्या भाषणातून स्तुतीसुमने उधळली. तर सांब मंदिर परिसरातून काढण्यात आलेली वृक्षदिंडी लक्षवेधी ठरली.

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. सध्या पावसाची अनियमितता असून त्यामुळे समाजपयोगी काम म्हणून पोलीस पाटील समूहाकडून वृक्षारोपणसारखा हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, जनसेवक, निसर्गप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे पोलीस पाटील समूहाकडून आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी श्री. कोळी यांनी तर आपल्या भाषणात बोलताना म्हटले कि, आपल्या ३३ वर्षांच्या सेवेत पोलीस पाटील समूहाकडून अशाप्रकारचा पहिल्यांदाच स्तुत्य उपक्रम आपण पाहत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वृक्ष लागवड कशी करावी व त्यानंतर लागवड केलेल्या झाडांची कशी काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनीही यावेळी बहुमोल मार्गदर्शन केले.

या स्तुत्य कार्यक्रमासाठी पाटगाव ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी पाटगाव व येथील ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील समूहाचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव प्रदीप जाधव, खजिनदार राजाराम खेडेकर, सल्लागार सतिश अणेराव, देवदास सावंत, विजय शेलार व सर्व सहकारी यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी श्री. कोळी, वनविभागाच्या कांबळे मँडम, देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, पोलीस निरीक्षक श्री. रणदिवे, पो. हे. काँ. सागर मुरूडकर, पाटगाव सांब मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुभाष नटे, कार्यकारणीचे सदस्य, सर्व मानकरी, ग्रा. पं. सदस्य, स्वामी सेवक शिंदे महाराज,
सामाजिक कार्यकर्ते, जनसेवक, निसर्गप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे आभार पोलीस पाटील समूहाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी मानले. दरम्यान, देवरूख विभागातील पोलीस पाटील समूहाकडून आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडी व वृक्षलागवड या आगळ्यावेळ्या उपक्रमाची देवरूख परिसरात मात्र जोरदार चर्चा होती.